अकोला जिल्ह्यात २७ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:08 PM2019-07-15T12:08:01+5:302019-07-15T12:08:06+5:30
जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २७ गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.
अकोला : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २७ गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. पाणीटंचाईग्रस्त या गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून जात असला तरी, जिल्ह्यात अद्याप सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. नदी-नाले कोरडेच असून, विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या कायम आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यातही ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांतील पाणीटंचाईग्रस्त २७ गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून, ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.
टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली अशी आहेत गावे!
तालुका गावे टँकर
अकोला २ २
बार्शीटाकळी ८ ९
अकोट ३ ३
बाळापूर ७ ११
पातूर ६ ६
मूर्तिजापूर १ १
.............................................
एकूण २७ ३२
जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा!
पावसाळ्यातही जिल्ह्यातील विविध भागात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार आणि जिल्ह्यातील धरणे आणि जलसाठ्यांमध्ये पुरेसा जलसाठा केव्हा उपलब्ध होणार, याबाबत जिल्ह्यात सर्वत्र प्रतीक्षा केली जात आहे.