अकोला अकोलाजिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांची ‘अपॉइंटमेंट’ आता ऑनलाइन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 01:01 PM2020-03-07T13:01:52+5:302020-03-07T13:05:05+5:30
डॉक्टरांची आॅनलाइन ‘अपॉइंटमेंट’ घेण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
- प्रवीण खेते
अकोला : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता देशभरात प्रतिबंधात्मक उपयायोजनांवर जास्त भर दिला जात आहे. अशातच अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयाने रुग्ण व नातेवाइकांची गर्दी टाळण्यासाठी डॉक्टरांची आॅनलाइन ‘अपॉइंटमेंट’ घेण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने नवजात शिशूंसह वृद्धांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. माता व नवजात शिशूंना होणारा संभाव्य संसर्ग टाळण्यसाठी येथे येणाऱ्या नातेवाइकांची गर्दी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने तपासणीसाठी डॉक्टरांची ‘अपॉइंटमेंट’आॅनलाइन पद्धतीने करावी लागणार आहे. त्यामुळे अपॉइनमेंट दिलेल्या गर्भवतींचीच वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. परिणामी रुग्णालयात होणारी गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम सध्या तरी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून, लवकरच तो कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. शिवाय, नवजात शिशूंना बघण्यासाठी येणाºया नातेवाइकांकरिता विशेष व्यवस्था केली जाणार असल्याचेही रुग्णालय प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
उद््घाटन कार्यक्रम केला रद्द!
जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आॅनलाइन ‘अपॉइंटमेंट’ उपक्रमाचे उद््घाटन रविवार ८ मार्च रोजी नियोजित केले होते; परंतु उद््घाटन कार्यक्रमात होणाºया गर्दीपासून संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे; परंतु लवकरच या उपक्रमाचे उद््घाटन केले जाणार असल्याची माहिती आहे.
नातेवाइकांमध्ये केली जनजागृती
कोरोनाचा संभाव्य धोका पाहता जिल्हा स्त्री रुग्णालयात येणाºया गर्भवतींसह त्यांच्या नातेवाइकांमध्ये कोरोनाविषयी गुरुवारी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये गर्भवतींसह त्यांच्या नातेवाइकांनी स्वच्छता राखणे, शिंकताना रुमालाचा उपयोग करणे, नियमित हात स्वच्छ धुणे यासह नवजात शिशूंना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे आदींबाबत जनजागृती करण्यात आली.
जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोनाविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी आॅनलाइन अपॉइंटमेंट सेवा सुरू करण्याचे विचाराधीन आहे. लवकरच हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला