अकोला जिल्ह्यातील ४७२ शाळांना १00 टक्के निकालाचे टार्गेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:45 PM2019-04-16T12:45:51+5:302019-04-16T12:45:57+5:30
माध्यमिक शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्ष २0१९ मध्ये जिल्ह्यातील ४७२ शाळांना १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट दिले आहे.
अकोला: इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी आणि दर्जेदार निकाल लागावा, या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्ष २0१९ मध्ये जिल्ह्यातील ४७२ शाळांना १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट दिले आहे. गतवर्षी ५४0 शाळांना १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट दिले होते; परंतु जिल्ह्यातील केवळ ५२ शाळांनीच उद्दिष्ट प्राप्त केले.
जिल्ह्यातील खासगी, जिल्हा परिषद शाळांसोबतच मनपा, नगर परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे, त्यांच्या निकालात सुधारणा दिसावी, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शाळांना अनेक उपक्रम दिले आहेत. यात गुणवत्ता कक्ष, मदरस्कूल, बायोमेट्रिक उपस्थिती व्यवस्था, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ई-लर्निंग, तंत्रस्नेही शिक्षक, ज्ञानरचनावाद, डिजिटल शाळा, शाळासिद्धीसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. शाळांची शैक्षणिक कामगिरी या उपक्रमांतर्गंत दरवर्षी शाळांना निकालाचे उद्दिष्ट दिल्या जाते. यंदा २0१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ४७२ शाळांना १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट दिले आहे. २६ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्रास प्रारंभ होणार आहे. या शैक्षणिक सत्रामध्ये शाळांनी गुणवत्ता व निकाल वाढविण्यावर भर देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी शाळांना इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच त्यांचा निकालसुद्धा वाढवावा लागणार आहे. गतवर्षात जिल्ह्यातील ५४0 शाळांपैकी केवळ ५२ शाळांचाच निकाल १00 टक्के लागला होता. उर्वरित शाळा मात्र निकालामध्ये माघारल्या होत्या. यंदा मात्र ही संख्या दुप्पट तरी झाली पाहिजे. यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
गतवर्षी शाळांना दिले होते उद्दिष्ट!
इ. नववी- १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट- ३९0 शाळा
इ. दहावी- १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट- १५0 शाळा
१00 टक्के निकाल लागलेल्या- ५२ शाळा