अकोला जिल्ह्याचा ‘जेआरडी टाटा मेमोरियल’ पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:08 PM2018-10-15T18:08:39+5:302018-10-15T18:09:27+5:30
अकोला: अकोला जिल्हा सध्या विविध विकास कामांत अग्रेसर होत आहे. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व लिंग गुणोत्तर प्रमाणात जिल्हयाने आघाडी घेतली असून, याबददल जिल्हयाला नुकतेच जेआरडी टाटा मेमोरियल या मानाच्या पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरवण्यात आले आहे.
अकोला: अकोला जिल्हा सध्या विविध विकास कामांत अग्रेसर होत आहे. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व लिंग गुणोत्तर प्रमाणात जिल्हयाने आघाडी घेतली असून, याबददल जिल्हयाला नुकतेच जेआरडी टाटा मेमोरियल या मानाच्या पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरवण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील विविध विकास कामांना गती मिळाली आहे. आरोग्य, स्वच्छता व शिक्षण क्षेत्रातही अकोला जिल्हयात उत्तम कार्य होत आहे. सहाव्या जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्काराचे वितरण १२ आॅक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील हॅबिटेट सेंटर येथे पार पडले. नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांना जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह आणि दोन लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
अकोला जिल्हयात लिंग गुणोवत्तर प्रमाणातील सुधारणा, पुरुष व महिलांचे वाढलेले साक्षरतेचे प्रमाण आणि स्वच्छतेसह पिण्याच्या पाण्याचे उत्तम स्त्रोत व पुरवठा याबददल जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार जिल्हयाला मिळाला आहे. जिल्हयाचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९४६ इतके झाले असून, पुरुष व महिला साक्षरतेचे प्रमाण अनुक्रमे ९१.३ टक्के आणि ८३.५ टक्के झाले आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुविधेमध्ये जिल्हयाने चांगले काम केले आहे. यामध्ये ९७.४ टक्के काम झाले आहे. तसेच जिल्हा हगणदारी मुक्त झाला असून सदर सर्व बदलाबददल अकोला जिल्हयाला जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार मिळाला आहे.
पालकमंत्र्यांनी केला गौरव
जिल्हाधिकारी यांच्या दालनात सोमवारी झालेल्या छोटे खानी कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी अकोला जिल्हयाला जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार मिळाल्याबददल जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांचे अभिनंदन केले. स्वत: त्यांनी हा पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे उपस्थित होते. या पुरस्काराच्या यशात जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैदयकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड व अन्य वैदयकीय अधिकारी व जिल्हा परिषद तसेच संबंधित विभागाचे प्रमुख यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.