अकोला जिल्ह्यात पावसाची हजेरी!
By admin | Published: June 27, 2017 10:13 AM2017-06-27T10:13:49+5:302017-06-27T10:13:49+5:30
उकाड्याने त्रस्त अकोलेकरांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यातील काही भागात व शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने त्रस्त अकोेलेकरांना दिलासा मिळाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शहरातील काही भागात शुक्रवारी पाऊस बरसला होता. त्यानंतर सोमवारी दिवसभर प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळी अचानक ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटासह अकोला शहरातील काही भाग व शहरालगतच्या गावात पाऊस कोसळला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. अकोला तालुक्यातील शहरालगतच्या गावात पाऊस पडल्याने मूग पिकाला हा पाऊस संजीवनी ठरला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, मोठी उमरी, गुडधी, यावलखेड त्यापुढील गावापर्यंत पावसाने हजेरी लावली; पण या भागात हा पाऊस तुरळक स्वरू पाचा होता.
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, व्याळा, हाता परिसरात जोरदार पाऊस झाला.अकोला तालुक्यातील कंचनपूर, बादलापूर,अमानतपूर ताकोडा येथे जोरदार पाऊस झाला. हातरुण येथे पावसाच्या सरी कोसळल्या. मूर्तिजापुरातही पाऊस झाला. या पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे, तसेच आधी पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे.