अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार ‘एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:34 PM2019-06-24T13:34:45+5:302019-06-24T13:37:08+5:30
अकोला शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी आगमन झाले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या मान्सूनच्या पावसाचे अकोला शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी आगमन झाले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अचानक सायंकाळी आलेल्या पावसामुळे कुरणखेड येथील आठवडी बाजारात व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांची दाणादाण उडाली. पावसात व्यापाऱ्यांचा माल वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अकोला जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची प्रतीक्षा होती. रविवारी सायंकाळी मूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील कुरूम व परिसरात दमदार पाऊस झाला. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार, अडगाव, हिवरखेड, बेलखेड परिसरात रविवारी जोरदार पाऊस झाला. अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात तसेच बाळापूर तालुक्यातील लोहारा, वाडेगाव, हातरूण येथे पावसाचे आगमन झाले. बोरगाव मंजू, डोंगरगाव मासा येथे वादळासह जोरदार पाऊस झाला. पातूर तालुक्यातील बेलुरा, आलेगाव, दिग्रस बु. परिसरातही पाऊस झाला. दरम्यान, २२ जून रोजीही जिल्ह्यातील काही भागात वादळवाºयासह जोरदार पाऊस झाला होता.
पावसात व्यापाºयांचा माल गेला वाहून
वणी रंभापूर : कुरणखेड येथे रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आठवडी बाजारातील व्यापाºयांचा माल वाहून गेला. अचानक आलेल्या या पावसामुळे ग्रामस्थांचीही एकच धावपळ उाडाली. बाजारात तीन ते चार फूट पाणी साचल्याने अनेक व्यापाºयांचा भाजीपाला, शेवचिवडा व इतर माल पाण्यात वाहून गेला. त्यामुळे व्यापाºयांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. मान्सूनपूर्व स्वच्छता अभियान राबविले नसल्याने बाजारात सगळीकडेच पाणी साचले होते.
दोन ठिकाणी कोसळली वीज!
बार्शीटाकळी तालुक्यात २२ जून रोजी वादळवाºयासह जोरदार पाऊस झाला. या पावसादरम्यान, सायखेड शिवारात वीज पडल्याने धामणदरी येथील सीताराम राठोड यांच्या मालकीचा गोºहा ठार झाला, तसेच मांगुळ शिवारात विद्युत तारेवर वीज पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. विजेचे खांबही कोसळले.
खूप उशिरा पोहोचला
साधारणपणे विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची तारीख ७ ते ८ जून आहे; परंतु यंदा २३ जून रोजी विदर्भात मान्सून दाखल झाला. गेल्यावर्षी ८ जून रोजी विदर्भात मान्सून धडकला होता. पूर्ण मोसमात ८७५.४ मिमी इतका पाऊस झाला. जो सरासरीपेक्षा ८ टक्के कमी होता. मागील पाच वर्षांत यंदा पहिल्यांदाच विदर्भात सर्वाधिक उशिरा मान्सून सक्रिय झाला आहे.