अकोला, तुला ‘पीडब्ल्यूडी’ वर भरोसा नाय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:23 AM2017-07-21T01:23:22+5:302017-07-21T01:23:22+5:30
टिळक रोडवर साचले पाणी : वाहने काढताना नागरिकांची कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय’ हे मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरील रेडिओ जॉकी मलिष्काचे विडंबन गीत सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. या गाण्यासारखी स्थिती अकोल्यातआहे. अकोल्यातील खोदून ठेवलेल्या टिळक मार्गावर बुधवारी रात्री आलेल्या पावसाचे पाणी साचले असून, या पाण्यातून वाट काढताना नागरिक व वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) च्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यांवर जाणाऱ्या नागरिकांच्या या केवीलवाण्या स्थितीवर ‘अकोला, तुला पी डब्ल्यू डी वर भरोसा नाय काय?’ असे गाणे सहजपणे अकोलेकरांच्या ओठांवर येत आहे.
शहरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असून, याच मालिकेत सिटी कोतवाली ते शिवाजी कॉलेजपर्यंतच्या टिळक रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर मार्ग हा राज्य महामार्गाचा भाग असल्यामुळे त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. पहिल्या टप्प्यात सिटी कोतवाली ते रयत हवेलीपर्यंतच्या रस्त्याचे सहा ते सात फुटांपर्यंत खोदकाम करण्यात आले. त्यानंतर अर्ध्यापर्यंत भराव टाकण्यात आला. रस्ता खोदलेल्या स्थितीत असतानाचा रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबांमुळे गत दोन महिन्यांपासून हे काम रखडलेले आहे. पावसाळ्यात सुरुवातीला दमदार पाऊस झाला नाही, त्यामुळे या खोदलेल्या रस्त्यावर पाणी साचले नव्हते. दरम्यान, बुधवारी रात्री अकोला शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या रस्त्यावर दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचले असून, रस्त्याला कालव्याचे रूप आले आहे. गुरुवारी दिवसभर या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांच्या दुचाकी पाण्यात बंद पडल्यामुळे त्यांना भर पाण्यातून लोटत आपले वाहन बाहेर काढावे लागले.
ग्राहक फिरकेना; व्यवसायांवर परिणाम
टिळक मार्ग हा मुख्य बाजारपेठेचा भाग असून, या मार्गावर कापडापासून ते इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची छोटी-मोठी दुकाने आहेत. रस्ता खोदलेला असल्यामुळे गत दोन ते तीन महिन्यांपासून व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे दुकानांकडे नागरिक फिरकले नाहीत. त्यामुळे दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.