अकोला : ‘आरओ’ कार्यालयात जाळले भूखंड घोटाळ्याचे दस्तावेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:38 AM2018-01-05T02:38:16+5:302018-01-05T02:46:23+5:30
अकोला : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अमरावती कार्यालयातील आगीत अकोला एमआयडीसीत झालेल्या भूखंड घोटाळ्य़ाचे दस्तावेज जाळण्यात आले असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अकोला एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी इंद्दरजसिंग छटवाल, तपस्यू मानकीकर आणि राजू कुमार जैन यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे. यासंदर्भातील निवेदन एमआयडीसी सीओ कार्यालय आणि राजापेठ पोलीस ठाणेदारास देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती येथील एमआयडीसीच्या आरओ कार्यालयातील आग संशयास्पद असून, त्याची चौकशी करण्यात यावी. सोबतच या आगीत भस्मसात झालेल्या अकोला, यवतमाळ येथील वादग्रस्त भूखंडांचे दस्तावेज आहेत. अकोला-अमरावती येथील दलालांनी मिळून हे वादग्रस्त दस्तावेज नष्ट केल्याचेही या पदाधिकार्यांचे म्हणणे आहे.
अकोला एमआयडीसीतील भूखंड परस्पर दुसर्यांच्या नावे वळते करण्याचे प्रयोग झाले आहेत. यामध्ये अकोला एमआयडीसी फेज क्रमांक चारमधील एन-१६0 क्रमांकाचा सुनील मदनलाल चिराणीया आणि ट्रान्सपोर्ट नगरातील टीए ७८ क्रमांकाचा कृपा विक्रम शहा यांचा भूखंड आहे. दोन्ही भूखंड वाटपातील डिमांड ड्राफ्टचे क्रमांक आणि ते कुणाच्या खात्यातून जमा झालेत याची माहिती समोर येणार असल्याने पुरावे नष्ट करण्यात आलेत. अकोल्यातील एका नामांकित शेड्यूल बँकेचा डीडीही बनावट असण्याची शक्यता आहे.
सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचा डेटा तपासावा, तसेच मोबाइल संभाषणाचे सीडीआर तपासावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. तत्कालीन विभागीय प्रादेशिक अधिकारी आणि अकोला क्षेत्रीय अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत. हे सर्व पुरावा दर्शविणारे दस्तावेज २५ डिसेंबर रोजी बडनेरा मार्गावरील कार्यालयात लागलेल्या आगीत संशयास्पदरीत्या नष्ट झाले आहेत. काही दलालांकडून असोसिएशनच्या पदाधिकार्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत, असेही पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले आहे.
असोसिएशनच्या विरोधात काढली पत्रके
असोसिएशनच्या नावाने पदाधिकारी अधिकारी, उद्योजकांना लुटत असल्याचे सहा पानी पत्रक काढले गेले आहे. या पत्रकांवर निनावी पीडित लिहिले असून, दिल्लीपर्यंतच्या संबंधित २५ जणांना त्याच्या प्रती पाठविल्या गेल्या आहेत. त्यात असोसिएशनचे आणि अधिकार्यांचे संबंधही अधोरेखित करण्यात आले आहेत. या पत्रकाबाबत गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता, पत्रक काढणार्यांनी समोर येऊन तक्रार नोंदवावी, असे आव्हान त्यांनी केले.