अकोला : विकास कामांसाठी प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर नकोच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:00 AM2020-05-06T10:00:00+5:302020-05-06T10:00:40+5:30
आरोग्य तपासणी करण्याची अट घालून देत आता प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर नकोच, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्य शासनाने २० एप्रिलनंतर प्रलंबित विकास कामांना सुरुवात करण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी विकास कामे सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दर्शविली होती. यादरम्यान, कामावरील मजुरांची दर आठ दिवसांनी आरोग्य तपासणी करण्याची अट घालून देत आता प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर नकोच, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता या भागातील मजुरांनीसुद्धा तूर्तास कंत्राटदारांना नकार दिल्याची माहिती आहे.
कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाउन घोषित केले आहे. दरम्यानच्या कालावधीत २० एप्रिलपासून प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच महापालिका क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांचा समावेश आहे. प्रलंबित विकासकामांच्या संदर्भात महापालिका प्रशासनाला दिशानिर्देश प्राप्त झाल्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी विकास कामे करण्याला मंजुरी दिली. शहरातील प्रलंबित रस्ते, नाल्या, नाल्यांवरील धापे, उद्यानांचे सौंदर्यीकरण, सामाजिक सभागृह आदी बांधकाम करीत असताना आपसात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे. यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांनी धोरण निश्चित करीत विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी कामावरील मजुरांची दर आठ दिवसांनी सक्तीने आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. तसेच शहरात कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर तूर्तास ठेवू नका, अशा सूचना प्रशासनाने जारी केल्या आहेत.
बहुतांश मजूर प्रतिबंधित क्षेत्रातील
कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव शहरातील अकोट फैल, बैदपुरा, ताजनापेठ, मोहम्मद अली रोड, जुने शहरातील खैर मोहम्मद प्लॉट, गुलजारपुरा, वाशिम बायपास भागातील कमल नगर आदी भागात झाला आहे. नेमके याच प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर महापालिकेच्या विकास कामांवर नियुक्त केले जातात. या परिसरातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता तूर्तास प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर वगळण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.
प्रलंबित विकास कामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत . यादरम्यान संसर्गजन्य कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षता कंत्राटदारांना व मजुरांना घ्यावी लागणार आहे.
- संजय कापडणीस
आयुक्त, मनपा