अकोला : आठ वर्षांनंतर झाली आई-वडील अन् मुलाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 02:13 AM2018-02-14T02:13:56+5:302018-02-14T02:15:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आईसोबत क्षुल्लक कारणावरून २0१0 मध्ये वाद झाल्यानंतर घरून निघून गेलेला १३ वर्षांचा मुलगा तब्बल आठ वर्षांनी सोमवारी घरी परतला. आठ वर्षांपासून मुलाचा चेहरा पाहण्यासाठी आई-वडील चातकासारखी वाट पाहत होते. त्याला पाहताच आई-वडिलांचे डोळय़ांत आनंदाश्रू तरळले.
किसन गिरी यांचा मुलगा संदीप याचा त्याच्या आईसोबत ११ जुलै २0१0 रोजी वाद झाला होता. आईसोबत वाद झाल्यानंतर संदीप रागाच्या भरात निघून गेला होता. घरून थेट अकोला रेल्वेस्थानकावर गेलेला संदीप रेल्वेत बसला आणि कोलकाता येथे पोहोचला. इकडे त्याचे आई-वडिलांनी संदीपचा शोध सुरू केला; मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर संदीपचे वडील किसन गिरी यांनी २0 जुलै २0१0 रोजी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. सिव्हिल लाइन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला; मात्र पोलिसांनाही त्याचा पत्ता लागला नाही.
दुसरीकडे कोलकातामध्ये पोहचलेला संदीप कमी वयातच स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी बनियान तयार करणार्या कंपनीमध्ये रोजंदारीमध्ये काम करीत होता. कंपनीच त्याचे घर झाले होते. मिळालेल्या पैशांमधून मिळेल ते खाऊन त्याने आयुष्याची वाटचाल सुरू केली. तिथे पाच वर्षे काम केल्यानंतर तो सुरत येथील प्लास्टिकच्या कंपनीमध्ये काम करण्यास गेला. गेल्या तीन वर्षांपासून तो तिथेच काम करीत असताना त्याला आई-वडिलांची आठवण झाली आणि क्षणाचाही विलंब न करता संदीपने अकोल्याचा रस्ता गाठला. अकोल्यात आलेल्या संदीपने जुन्या घराच्या पत्त्यावर आई-वडिलांचा शोध घेतला; मात्र ते हे घर सोडून केव्हाचेच गेल्याचे त्याला समजल्याने त्याला मोठा धक्का बसला; मात्र आई-वडिलांच्या भेटीसाठी आतुरलेल्या संदीपने त्यांचा अकोल्यात शोध सुरू केला अन्आई-वडील शिवणीमध्ये राहत असल्याची माहिती त्याला मिळाली. क्षणाचाही विलंब न करता संदीपने शिवणी येथील आई-वडिलांचे घर गाठले. आठ वर्षांपूर्वी गेलेला संदीप अचानक डोळय़ांसमोर उभा झाल्याने आई-वडिलांना विश्वास बसला नाही. दोघांच्याही डोळय़ांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. संदीप आई-वडिलांच्या कुशीत एखाद्या लहान मुलाप्रमाणे गेला आणि उपस्थित असलेल्या पोलिसांसह सर्वांची डोळे पाणावले. या प्रकारानंतर पोलिसांनी संदीपचे बयाण नोंदविले.