अकोला: खडकी परिसरात ११ ठिकाणी वीज चोरी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:21 PM2019-12-13T18:21:17+5:302019-12-13T18:21:34+5:30
अधीक्षक अभियंत पवनकुमार कछोट यांनी स्वत: या मोहीमेत पुढाकार घेत भरारी पथक व उपविभागाचे कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई यशस्वी केली आहे.
अकोला: महावितरणच्याअकोला शहर विभागाने खडकी परिसरात प्रत्येकी १ लाखापेक्षा जास्त वीज चोरी असणाऱ्या ११ ठिकाणी एकाच वेळी धाड टाकत वीज चोरी पकडली आहे. अधीक्षक अभियंत पवनकुमार कछोट यांनी स्वत: या मोहीमेत पुढाकार घेत भरारी पथक व उपविभागाचे कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई यशस्वी केली आहे.
मुख्य अभियंता अनिल डोये यांनी सतत वीज चोरीविरूध्द कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर अकोला शहर विभागाच्यावतीने नुकताच केलेल्या अकोट फैल नंतर खडकी परिसरातील ही त्यांची मोठी कारवाई आहे. विद्युत कायदा कलम १३५ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत नियमानुसार वीज चोरीची रक्कम आणि दंड न भरल्यास त्यांच्यावर पोलीस ठाण्यात फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. यापुढे आकस्मिक आणि सतत कारवाई करण्याचे नियोजन महावितरण शहर विभागाने तयार केले आहे. ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात प्रभारी कार्यकारी अभियंता शहर गणेश महाजन उपकार्यकारी अभियंता संतोष राठोड, सहाय्यक अभियंते लहाने, ठोंबरे , बोरकरसह तांत्रिक कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
वीज चोरीचे अफलातून प्रकार उघड
हुक टाकून थेट वीज चोरी करणे किंवा घरगुती वापरासाठी वीज घेऊन तीचा व्यवसायासाठी वापर करणे यापेक्षाही पुढे जाऊन वीज चोरीचे अफलातून प्रकार उघडकीस आले आहे. यामध्ये मीटरमध्ये रेझिस्टंट बसवून रिमोट कंट्रोलचा वापर करून वीज चोरी करणे, मीटरच्या मागच्या बाजूला छिद्र पाडून सीटी ची वायर कट करणे, मीटर बायपास करणे, पुश बटन डॅमेज करणे जेनेकरून रिडींग दिसणार नाही, सीटी म्हणजेच करंट ट्रांन्झीस्टर शॉर्ट करणे जेणेकरून किती वीज वापरली याचा मोजमापच होणार नाही. याशिवाय मीटरमध्ये असलेल्या पीटीची वायर कट करणे असे अनेक अफलातून प्रकारातून वीज चोरी करत असल्याचे उघड झाले आहे.