अकोला : सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:50 AM2017-12-19T01:50:22+5:302017-12-19T01:51:29+5:30
अकोला : सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवरील मुख्य चौकात एका कर्मशियल कॉम्पलेक्सच्यावतीने उभारण्यात आलेले अतिक्रमण अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. रस्त्यालगत नव्हे तर चक्क रस्त्यावरच अनधिकृतपणे पेव्हर ब्लॉक व त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आल्याचे उघड्या डोळ्य़ांनी दिसत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुप्पी साधली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवरील मुख्य चौकात एका कर्मशियल कॉम्पलेक्सच्यावतीने उभारण्यात आलेले अतिक्रमण अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. रस्त्यालगत नव्हे तर चक्क रस्त्यावरच अनधिकृतपणे पेव्हर ब्लॉक व त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आल्याचे उघड्या डोळ्य़ांनी दिसत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुप्पी साधली आहे. थेट मुख्य रस्त्यावर उभारलेल्या अतिक्रमणाकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने कोणाचे खिसे जड झाले, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.
शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून गांधी रोडकडे पाहिल्या जाते. सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून ते रेडिमेड कपड्यांसह विविध वस्तूंची या परिसरात बाजारपेठ आहे. शहरातील खवय्यांची गांधी चौकातील चौपाटीवर चांगलीच गर्दी राहते. अर्थातच, प्रचंड गर्दीमुळे अकोलेकरांना गांधी रोडवरून चालताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते. गांधी रोड परिसरातील वाढत्या अतिक्रमणामुळे अकोलेकरांच्या समस्येत भर पडली आहे. गांधी चौकातील अतिक्रमकांकडे महापालिका प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्यामुळेच अतिक्रमकांच्या दादागिरीने उचल खाल्ली आहे. मनपाच्या आवारभिंतीलगत ‘पार्किंग’साठी जागा राखीव असताना अतिक्रमण विभागाच्या नाकावर टिच्चून रेडिमेड कापड व्यावसायिक दुकाने थाटतात. सणासुदीच्या दिवसांत अतिक्रमकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गळ काही राजकीय पदाधिकार्यांकडून घातली जाते. त्याचवेळी अतिक्रमणाचा अकोलेकरांना त्रास झाल्यास हेच पदाधिकारी महापालिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हे विशेष. गांधी चौकातील एका कर्मशियल कॉम्प्लेक्सच्यावतीने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली चक्क रस्त्यावरच पेव्हर ब्लॉक उभारून त्याला लाखंडी ग्रील लावली आहे. पेव्हर ब्लॉक बसवताना मनपाचे सर्व निकष नियम पायदळी तुडवत गांधी चौकातील थेट मुख्य रस्त्याचा वापर करण्यात आला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला लघू व्यावसायिक त्यांच्या हातगाड्या लावून व्यवसाय करत असल्यामुळे मुख्य रस्त्यावरून चालावे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पार्किंगच्या जागेवर व्यवसाय कसा?
गांधी चौकातील दुर्गा देवीच्या मंदिरासमोरील जागा पार्किंगसाठी राखीव आहे. तीन दिवसांपूर्वी याठिकाणी पार्किंग स्टॅन्ड निर्माण करण्यात आले. तिसर्याच दिवशी पार्किं गच्या जागेवर काही अतिक्रमकांनी व्यवसाय उभारल्याचे चित्र समोर आले आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होतेच कसे, असा सवाल उपस्थित होतो.
गांधी चौकातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष का?
गांधी रोडवरील अतिक्रमणाचा अकोलेकरांना वैताग आला आहे. गांधी चौकात चक्क रस्त्यावरच पेव्हर ब्लॉक, लोखंडी ग्रीन उभारण्यात आल्यामुळे समस्येत अधिकच भर पडली आहे. याठिकाणी लघू व्यावसायिक, फेरीवाले, ऑटोचालकांमध्ये दररोज वादावादी-कटकटी होतात. जेसीबीचा धाक दाखवून रस्त्यालगतच्या अतिक्रमकांना हुसकावणारे अतिक्रमण विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांना गांधी चौकातील अतिक्रमण दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
-