Akola: दुष्काळाच्या उंबरठ्यावर आलो तरी अतिवृष्टीची भरपाई मिळेना!
By संतोष येलकर | Published: August 26, 2023 07:48 PM2023-08-26T19:48:03+5:302023-08-26T19:48:40+5:30
Akola: अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयातील २ लाख ५ हजार ५४० शेतकऱ्यांचे १ लाख ६८ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, नुकसानीचा अहवाल पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
- संतोष येलकर
अकोला - अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयातील २ लाख ५ हजार ५४० शेतकऱ्यांचे १ लाख ६८ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, नुकसानीचा अहवाल पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला; मात्र नुकसानीची मदत अद्याप मिळाली नाही.
या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदतीची रक्कम खात्यात जमा होणार तरी कधी, याबाबतची आस नुकसान झालेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांना लागली आहे.यंदाच्या पावसाळ्यात गेल्या २१ व २२ जुलै रोजी जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला असून, त्यामध्ये काही भागात अतिवृष्टीदेखील झाली.तसेच नदी व नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शेती आणि पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, त्यानुसार अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ५४० शेतकऱ्यांचे १ लाख ६८ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावरील शेती आणि पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १६४ कोटी १४ लाख ५० हजार ९५५ रुपये अपेक्षित मदतनिधीची मागणी गेल्या २२ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात करण्यात आली; परंतू अद्याप नुकसानीची मदत शासनाकडून मंजूर करण्यात आली नसल्याने, शेती आणि पीक नुकसानीची मदत खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबतची प्रतीक्षा जिल्हयातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मदतीच्या प्रतीक्षेत तालुकानिहाय शेतकऱ्यांची अशी आहे संख्या !
तालुका शेतकरी
अकोला ५९९८१
अकोट २४३१
बाळा ४४७८६
बार्शीटाकळी ४२४६९
मूर्तिजापूर १६१३३
पातूर ४४
तेल्हारा ३९६९६
संकटे थांबेनात; शेतकरी पेचात !
अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात गेल्या महिनाभरापूर्वी जिल्हयात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने पिके अडचणीत सापडली असतानाच वन्यप्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान आणि आता कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरु झाला. या पाश्वभूमीवर पीक नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसताना पिकांवर एका मागून एक येणारी संकटे थांबत नसल्याने, शेतकरी पेचात सापडला आहे.