भाजप नगरसेविकेच्या पतीकडून माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला; प्रकृती चिंताजनक

By आशीष गावंडे | Published: August 12, 2024 09:36 PM2024-08-12T21:36:37+5:302024-08-12T21:36:47+5:30

याप्रकरणी खदान पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akola Ex serviceman assaulted by BJP corporator husband | भाजप नगरसेविकेच्या पतीकडून माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला; प्रकृती चिंताजनक

भाजप नगरसेविकेच्या पतीकडून माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला; प्रकृती चिंताजनक

अकाेला: कारगील युध्दात देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या एका माजी सैनिकावर भाजपच्या माजी नगरसेविका पतीने प्राणघातक हल्ला करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ११ ऑगस्ट राेजी बाजोरिया नगरी नालंदा वाचनालय जवळ घडल्याचे समाेर आले आहे. या घटनेत माजी सैनिकाच्या डाेक्यात पाइपने जाेरदार प्रहार केल्यामुळे त्यांना गंभीर स्वरुपाची जखम झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी साेमवारी खदान पाेलिस ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेसह त्यांचा पती व इतर साथीदारांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नगरसेविका पती गजानन सोनोने (५०), मंगेश सावके (३५), गणेश (३५), शंकर चव्हाण (३८), हेमंत हिरोडकर (३६), भाजपच्या माजी नगरसेविका मंगला गजानन सोनोने (४०), अजय सोनोने (२७), प्रज्वल गजानन सोनोने (२५)सर्व रा. बाजोरिया नगरी अकाेला,अशी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहेत. याप्रकरणी फिर्यादी भारती बुद्धपाल सदांशिव (४० रा. बाजाेरिया नगरी नालंदा वाचनालयाजवळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,घटनेतील आराेपी फिर्यादीच्या घराच्या आवारभिंतीवर टीनाचे शेडचे लोखंडी पाईप रोवण्याचे काम करत होते. ही आमची जागा असल्यामुळे फिर्यादी व माजी सैनिक बुध्दपाल सदांशिव यांनी मनाई केली. यावरुन वाद वाढत जाऊन गजानन साेनाेने यांनी व उपराेक्त आराेपींनी घरात प्रवेश करीत बुध्दपाल यांना शिवीगाळ केली. तसेच अंगावर थुंकत किळसवाणा प्रकार केला. बुध्दपाल यांनी आरोपींना हटकले असता लोखंडी पाईपने डोक्यात व पायावर मारहाण करून गंभीर जखमी केले. बुध्दपाल यांची पत्नी ही वाचविण्यासाठी मधात गेली असता, त्यांनाही मारहाण केली. तसेच यापुढे गाडी खाली चिरडून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी भारती सदांशिव यांनी १२ ऑगस्ट राेजी दिलेल्या तक्रारीवरुन खदान पाेलिसांनी बीएनएस कलम १०९, १९०, १९१(३),७४,३५१(२),३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदाशिव यांच्या जागेत अतिक्रमण

माजी सैनिक बुध्दपाल सदांशिव यांच्या मालकीच्या जागेत मुख्य आराेपी गजानन साेनाेने याने अतिक्रमण केले. अतिक्रमण हटविण्यासाठी यापूर्वी जागेची माेजणी करण्यात आली असता, हा प्रकार समाेर आला हाेता. तरीही साेेनाेने यांनी अतिक्रमण न हटविता त्याठिकाणी दुधाळ जनावरांचा गाेठा बांधत शेणाची साठवणूक सुरु केली. या दुर्गंधीमुळे सदांशिव कुटुंबिय त्रस्त झाल्याची माहिती आहे.

Web Title: Akola Ex serviceman assaulted by BJP corporator husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.