Akola: अकोलामार्गे धावणाऱ्या दोन विशेष एक्स्प्रेसना सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ
By Atul.jaiswal | Published: June 29, 2024 06:20 PM2024-06-29T18:20:36+5:302024-06-29T18:21:57+5:30
Akola News: प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता मध्य रेल्वेने हैदराबाद-जयपूर व काचीगुडा-लालगुडा या दोन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाड्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला - प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता मध्य रेल्वेने हैदराबाद-जयपूर व काचीगुडा-लालगुडा या दोन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाड्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेतील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०७११५ हैदराबाद-जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ५ जुलै २०२४ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी दर शनिवारी पहाटे ५:४० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७११६ जयपूर-हैदराबाद साप्ताहिक विशेष गाडी ७ जुलै २०२४ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दर रविवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी दर सोमवारी दुपारी ३:१० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.
काचीगुडा-लालगढ एक्स्प्रेस
गाडी क्र. ०७०५३ काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे ६ जुलै २८ सप्टेंबरपर्यंत काचीगुडा येथून प्रत्येक शनिवारी रात्री २१:३० वाजता सुटेल आणि लालगढ जंक्शनला सोमवारी दुपारी १३:३५ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:२० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७०५४ लालगढ-काचीगुडा विशेष रेल्वे ९ जुलै ते १ ऑक्टोबरपर्यंत लालगढ येथून प्रत्येक मंगळवारी रात्री १९:४५ वाजता सुटेल आणि काचीगुडाला गुरुवारी सकाळी ०९:४० वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दुसऱ्या दिवशी रात्री २१:२० वाजता पोहोचणार आहे.