अकोल्यात दाना बाजारात भीषण आग; आठ दुकाने व एका गोदाम जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 08:46 AM2020-04-21T08:46:07+5:302020-04-21T17:17:23+5:30
आठ दुकाने व एका गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच सध्या कटेन्मेंट झोन घोषित असलेल्या दाना बाजारातील आठ दुकाने व एका गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत दुकान मालकांचे तब्बल एक कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कटेन्मेंट झोनमधील पोलिसांनी सुरुवातीला प्रयत्न केले; मात्र आग आटोक्याबाहेर गेल्याने तातडीने मनपाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेऊन १२ बंब पाणी रिचवून अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीनंतर शहरातील लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसान झालेल्या व्यापाºयांना मदत देण्याची मागणी केली. कोरोनामुळे कटेन्मेंट झोन घोषित केलेल्या मोहम्मद अली रोड, गांधी चौक, किराणा बाजार, दाना बाजार परिसरात जाण्यास प्रतिबंध आहे; मात्र अशातच दाना बाजारातील आठ दुकाने आणि एका गोदामातील साहित्याला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.
या परिसरातील ही प्रतिष्ठाने बंद असल्याने केवळ पोलीसच रस्त्यावर होते. त्यामुळे सिटी कोतवाली पोलिसांनी या आगीची माहिती तातडीने अग्निशमन विभागाला देऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. बाहेरुन केवळ एका दुकानामागे दिसत असलेली आग आतमध्ये गेल्यानंतर ८ दुकाने व एका गोदामातील साहित्याला लागल्याचे दिसून आले. नऊ दुकाने या आगीत सापडल्याने त्यामधील साहित्याची राखरांगोळी झाली तर व्यापाºयांचे तब्बल एक कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवालावरून उघड झाले. या आगीची माहिती मिळताच सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तमराव जाधव त्यांच्या ताफ्यासह दाखल झाले होते. त्यानंतर आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. बाजोरिया, महापौर अर्चना मसने, वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन व्यापाºयांना मदत करण्याची मागणी केली.
या दुकानांमध्ये लागली आग
दाना बाजारातील बोरकर किराणाच्या मागील बाजूस असलेल्या दुकानांना आग लागली. या आगीमध्ये सुनील इलेक्ट्रॉनिक्स, मे. रविकुमार छगनलाल, सुरेका ब्रदर्स धान्य व्यापारी, श्री दत्त प्रोव्हिजन, रोहीत मेटल्ससह नऊ दुकानांना भीषण आग लागली. या आगीत नऊ दुकानांचे
सुमारे एक कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. पोलीस, महसूल विभागाने केलेल्या पाहणीत हे नुकसान समोर आले आहे.