अकोला फुटबॉल संघटनेवर 'विफा'ची करडी नजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 03:12 PM2018-08-11T15:12:41+5:302018-08-11T15:16:37+5:30
अकोला: अकोला जिल्हा फुटबॉल संघटना अकार्यक्षम असल्याचा ठपका लावत, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने जिल्हा संघटनेत सुधारणा आणण्यासाठी नोटीस बजावली आहे.
अकोला: अकोला जिल्हा फुटबॉल संघटना अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवत, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने जिल्हा संघटनेत सुधारणा आणण्यासाठी नोटीस बजावली आहे. जिल्हा संघटनेने आतापर्यंत केलेल्या कामकाजाची पडताळणी करण्यासाठी अॅडॉक समितीची नेमणूक करण्यात आली आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेने या नोटीसमध्ये १९८२ पासून संघटनेने निवडणूक घेतली नसल्याचे म्हटले आहे, तसेच संघटनेने केलेल्या कोणत्याही कार्याचा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे सोपविला नसल्याचेही नमूद केले आहे. संघटनेने फुटबॉल स्पर्धादेखील आयोजित केलेल्या नाहीत. जिल्हा संघटनेशी ४० क्लब संलग्नित आहेत; मात्र याबाबत वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनकडे अहवाल संघटनेने पाठविलेला नाही.
स्थानिक खेळाडू व फुटबॉल क्लबची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनला तक्रार गेली असून, यामध्ये अकोला जिल्ह्यात फुटबॉल अॅक्टिव्हिटी होत नसल्याचे विफाने नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे. या सर्व बाबींवर वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करू न, अकोला जिल्हा फुटबॉल संघटनेवर देखरेख करण्यासाठी अॅडॉक समितीची स्थापना केली आहे. ही समिती अकोला जिल्हा फुटबॉल संघटनेने आतापर्यंत काय कामकाज केले, याचा अहवाल विफाकडे पाठविणार आहे.