अकोला : चार लाखांच्या ५८ किलो गांजासह दोघे गजाआड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 02:04 AM2018-04-13T02:04:22+5:302018-04-13T02:04:22+5:30
अकोला : स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी चान्नी फाट्यावर छापा घालून ४ लाख ६ हजार रुपये किमतीचा ५८ किलो १00 ग्रॅम गांजा जप्त करून दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री १.४५ वाजताच्या सुमारास केली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी पोलीस कारवाई असल्याचा दावा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत केला. आरोपींनी पुरवठा करण्यासाठी परराज्यातून गांजा आणल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

दोन व्यक्ती एका व्यापार्याला परराज्यातून प्रतिबंधित गांजाचा (कॅनाबिज) पुरवठा करण्यासाठी चान्नी फाट्यावर येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह चान्नी फाट्याजवळ सापळा लावला. या ठिकाणी दोन व्यक्ती तीन पांढर्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजा घेऊन असल्याचे दिसून आले. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी दोघांना घेराव घालून शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील पिशव्यांची झडती घेतली असता, त्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी त्यांची नावे श्याम रमेश काळपांडे (३२ रा. हिवरखेड), ओंकार अभिजित मोहिते (३0 रा. वारी हनुमान ता. तेल्हारा) असल्याचे सांगितले. ५८ किलो गांजा त्यांनी मध्य प्रदेशातून आणल्याचे सांगितले. दोघांविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अशी माहितीही पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय प्रकाश झोडगे, पीएसआय चंद्रकांत ममताबादे, एएसआय अशोक चाटी, जितेंद्र हरणे, अजय नागरे, शेख हसन, अब्दुल माजिद, एजाज अहमद, संदीप तवाडे, मंगेश मदनकार व संजय पाटील यांनी केली.
सिंधी कॅम्पमधून प्रतिबंधित गुटखा जप्त
शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने सिंधी कॅम्पमधील कच्ची खोली भागात दुकानावर छापा टाकू न ३२ हजार रुपये किमतीच्या प्रतिबंधित गुटख्याचे पाकिटे जप्त केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी केली. कच्ची खोलीत मोती गुलानी याच्या दुकानात प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दुकानावर छापा घालून विविध प्रकारचे सुगंधित तंबाखूची पाकिटे, प्रतिबंधित गुटख्याची पाकिटे जप्त केली आणि मोती गुलानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.