अकोला : सट्टाकिंग नरेश भुतडासह चौघे दोन वर्षांसाठी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:44 AM2018-01-11T01:44:58+5:302018-01-11T01:45:22+5:30
अकोला : अकोट येथील सट्टाकिंग तथा डब्बा ट्रेडिंग चालविणार्या नरेश भुतडा याच्यासह श्याम कडू, चेतन जोशी व वीरेंद्र रघुवंशी या चौघांना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी तब्बल दोन वर्षांसाठी अकोला जिल्हय़ातून तडीपार करण्याची कारवाई केली. सट्टा माफियाला जिल्हय़ातून तडीपार करण्याची ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोट येथील सट्टाकिंग तथा डब्बा ट्रेडिंग चालविणार्या नरेश भुतडा याच्यासह श्याम कडू, चेतन जोशी व वीरेंद्र रघुवंशी या चौघांना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी तब्बल दोन वर्षांसाठी अकोला जिल्हय़ातून तडीपार करण्याची कारवाई केली. सट्टा माफियाला जिल्हय़ातून तडीपार करण्याची ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी अकोटातील सट्टाकिंग नरेश भुतडा चालवित असलेल्या सट्टा बाजारावर छापा मारून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर अकोट शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले होते. या कारवाईनंतर लगेच डब्बा ट्रेडिंग चालविण्यात येत असल्याचीही माहिती मिळाल्यावरून त्यावेळी डब्बा ट्रेडिंगवर कारवाई करण्यात आली होती. विदर्भातील सर्वात मोठा सट्टा व डब्बा माफिया म्हणून नरेश भुतडा नामांकित आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सराईत गुन्हेगार म्हणून या सट्टाकिंगवर व त्याच्या साथीदारांवर अकोला जिल्ह्यातून तब्बल दोन वर्षांसाठी तडीपार करण्याची कारवाई केली. तडीपारीचा हा आदेश पोलीस अधीक्षकांनी दोन दिवसांपूर्वी दिला आहे. या चारही आरोपींना अकोला जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यातील सट्टामाफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अकोट शहरातील पोलिसांच्या अभिलेखावरील संपत्तीविषयक गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार, नरेश लक्ष्मीनारायण भुतडा, (५४) रा. लोहारी रोड अकोट, श्याम मधुकर कडू (४३) रा. उज्ज्वल नगर, अकोट, चेतन महेश जोशी (२७) रा. सत्यनारायण मंदिराजवळ अकोट व वीरेंद्र दर्यावसिंग रघुवंशी (३३) रा. सरस्वती नगर अकोट या सट्टा माफियांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ५५/प्र.क्र (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या चौघांना दोन वर्षांसाठी अकोला जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे क्रिकेट सट्टा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, त्यांचे धाबे दणाणले आहेत.
चंद्रकिशोर मीणा यांनी केली होती कारवाई
तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सट्टा माफिया नरेश भुतडा याच्या अवैध धंद्याचे जाळे पूर्णत: संपविले होते. राज्यात केवळ अकोटात चालू असलेल्या डब्बा ट्रेडिंगवर कारवाई करून नरेश भुतडाचा खरा चेहरा जिल्हय़ात उघडा केला होता. सट्टा बाजार व डब्बा ट्रेडिंगसारख्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केल्यानंतर नरेश भुतडास पळता भुई थोडी केली होती. त्यानंतर मीणा यांनीच या चौकडीवर तडीपारीच्या कारवाईसाठी प्रयत्न चालविले होते. मात्र, त्यांची बदली झाली आणि पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मीणा यांचा कित्ता पुढे सुरूच ठेवत, या चौकडीवर तडीपारीची कारवाई केल्याने अनेकांना धोक्याचा इशारा दिला आहे.
संघटित गुन्हेगारी
नरेश भुतडा याच्यासह चारही आरोपींवर अकोट पोलीस ठाण्यात प्रत्येकी चार गुन्हे दाखल असून, ते त्यांनी संघटितपणे केल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.
ही आहेत कारणे
- नरेश भुतडासह चौघे जण पोलिसांच्या रेकॉर्डवर सराईत गुन्हेगार आहेत.
- त्यांच्यापासून भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक धोका होऊ शकतो.
- डब्बा ट्रेडिंग चालविल्याने शेअर बाजाराला नुकसान पोहोचले.