सर्वोपचार रुग्णालयात रखडलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 10:18 AM2021-07-12T10:18:34+5:302021-07-12T10:21:16+5:30
Akola GMC and sarvopchar hospital : मागील पंधरा दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयातील रखडलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्या.
अकोला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वोपचार रुग्णालयात बहुतांश रुग्ण हे कोविडचे होते. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांच्या शस्त्रक्रिया ठप्प पडल्या होत्या. मात्र, अत्यावश्यक असलेल्या मोजक्या शस्त्रक्रिया या कालावधीत करण्यात आल्या होत्या. आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याने मागील पंधरा दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयातील रखडलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्या असून, दररोज सरासरी २५ शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने नाक, कान, घसा आणि डोळ्यांशी निगडित शस्त्रक्रियांचे प्रमाण जास्त आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा सर्वाधिक भार सर्वोपचार रुग्णालयावर होता. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील बहुतांश वार्ड कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. परिणामी नॉनकाेविड रुग्णसेवा प्रभावित झाली होती. मात्र, बाह्यरुग्ण विभाग नेहमी प्रमाणेच सुरू ठेवण्यात आला होता. या कालावधीत ज्या रुग्णांना अत्यावश्यक शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक होत्या, अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. दरम्यान, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया पूर्णत: बंद ठेवण्यात आल्या होत्या. जून महिन्याच्या अखेरीस कोविडची दुसरी लाट ओसरू लागल्याने सर्वाेपचार रुग्णालयातील कोविड रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे डोळ्यांचा वार्डही नेत्र विभागाकडे सोपविण्यात आला. याच दरम्यान म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढल्याने कान, नाक, घसा विभाग सुरू करून शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या. यासोबतच अस्थिरोग विभाग आणि स्त्री रोगशास्त्र विभागही पूर्ववत सुरू झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोणत्या शस्त्रक्रिया सुरू
ऑर्थो व गायनिक : अस्थिरोग शास्त्र विभाग आणि स्त्रीरोग शास्त्र विभागही निरंतर सुरू होता. मात्र, काेरोना काळाच्या तुलनेत सद्यस्थितीत ६० टक्क्यांनी शस्त्रक्रिया वाढल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
इएनटी : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असताना म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. यातील सुमारे शंभरपेक्षा जास्त रुग्णांची शस्त्रक्रिया करावी लागली. यासाठी कान, नाक, घसा विभागाची भूमिका महत्त्वाची ठरली.
नेत्र व सर्जरी विभाग : कोरोना काळात नेत्र आणि सर्जरी विभाग पूर्णत: ठप्प होते. आता रुग्णसंख्या कमी झाल्याने नेत्र व सर्जरी विभाग पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. शिवाय, रखडलेल्या शस्त्रक्रियाही सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोना काळातही सुरू होती ओपीडी
कोविडच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत होती. अशा परिस्थितीतही जीएमसीमधील ओपीडी सुरू होती.
यामध्ये प्रामुख्याने ऑर्थोच्या रुग्णांसह सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांवरही उपचार करण्यात आले.
कोविडच्या काळात ओपीडीमधील गर्दी तुलनेने कमी होती. आता मात्र ओपीडीमधील गर्दी वाढू लागली आहे.
गरिबांवर कोरोनाशिवाय इतर उपचार झाले कोठे?
जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट सुरू असताना बहुतांश रुग्णांनी घराजवळील डॉक्टरकडेच उपचार घेतले. काहींनी संपर्कातील डॉक्टरांकडून फोनवरील संभाषणावरूनच तात्पुरता उपचार घेतला.
दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना मात्र या काळात योग्य उपचार मिळाले नाहीत. कोविडमुळे शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रियाही ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे अशा रुग्णांना आजार अंगावर काढावा लागला.
कोरोना काळात सर्वोपचार रुग्णालयात अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरूच होत्या. विशेषत: ऑर्थो आणि गायनिक विभागही सुरूच हाेता. आता रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने इतर शस्त्रक्रिया सुरू झाल्या
आहेत. कोविड काळातही ओपीडी नेहमीप्रमाणेच सुरू होती.
- डॉ. श्यामकुमार सिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला