उच्च शिक्षणातून ‘ती’ बनली १.२ कोटींची धनश्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 02:00 PM2020-01-12T14:00:22+5:302020-01-12T14:01:04+5:30
अकोल्यातील एका मुलीने उच्च शिक्षण, मेहनत, आत्मविश्वासाच्या बळावर नामांकित अॅमेझॉन कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून धनश्री हे नाव सार्थक केले.
अकोला: लहानपणापासून हुशार...शिक्षणातील पहिला, दुसरा नंबर कधी सोडला नाही. तेवढीच जिद्दी, हट्टी. ठरविले तेच करायचे, असा स्वभाव. पुढे काय शिकायचे, हे माहीत नाही; परंतु पुढे दिशा मिळत गेली. पुणे व्हीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्समधून बीटेक केले. पुण्यात दोन वर्षे नोकरी केल्यानंतर उच्च शिक्षणाची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. एमएस करण्यासाठी तिने जीआरई आणि टीओईएफएलच्या प्रवेश परीक्षा दिल्या. अमेरिकेतील बफलो विद्यापीठातून एमएससाठी निवड झाली. आपण पुढे जाऊ, नाव कमवू, हा आत्मविश्वास तिला होता. त्या आत्मविश्वासाच्या जोरावरच ती १.२ कोटी रुपयांची धनश्री बनली आहे.
अॅमेझॉन नामांकित कंपनीने निवड करून तिला १ कोटी २0 लाख रुपये वार्षिक वेतन दिले. ही विद्यार्थिनी आहे, अकोल्यातील धनश्री दत्तराव सोळंके. वडील डॉ. दत्तराव सोळंके हे सुधाकर नाईक महाविद्यालयातून गणिताचे प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. धनश्रीचे प्राथमिक शिक्षण नोएल स्कूलमध्ये झाले. पुढे अकरावी, बारावी तिने सुधाकरराव नाईक महाविद्यालयातून उत्तीर्ण केली. धनश्री लहानपणापासूनच चुणचुणीत, हुशार, ठरविलेले करायचे. अभ्यासाचा कंटाळा तिलाही यायचा; परंतु जेवढा अभ्यास करायची, तेवढा मनापासून करायची. दहावीत तिने ९६ टक्के गुण मिळविले होते. अकरावी, बारावीत कॉम्प्युटर सायन्स शाखेत शिकताना, तिला प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. एस. डी. खोटरे व प्रा. खडके यांचे मार्गदर्शन मिळाले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषय शिक्षणाचा पाया आहे, हे समजले.
या प्राध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार तिने शिक्षणात वाटचाल केली. बारावीत ८५ टक्के गुण मिळाल्यानंतर तिला व्हीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. बीटेक केल्यानंतर पुण्यातच धनश्रीने एका कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केले; परंतु उच्च शिक्षणाची ऊर्मी असल्याने, तिने ‘जीआरई’ आणि ‘टीओईएफएल’च्या प्रवेश परीक्षा दिल्या. त्यासाठी तिने जिद्द, चिकाटी सोडली नाही. अडचणी आल्या. तिची अमेरिकेच्या बफलो विद्यापीठात निवड झाली. तेथे एमएसच्या शेवटच्या सेमिस्टरला असताना तिने अॅमेझॉन कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला. आॅनलाइन टेस्ट, टेलिफोनिक मुलाखत, प्रत्यक्ष मुलाखत झाल्यानंतर अॅमेझॉन कंपनीने तिची निवड केली आणि तिला १ कोटी १२ लाख रुपये वेतन देऊ केले. सध्या धनश्री सियाटंग (अमेरिका) येथे कार्यरत आहे. अकोल्यातील एका मुलीने उच्च शिक्षण, मेहनत, आत्मविश्वासाच्या बळावर नामांकित आणि गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून धनश्री हे नाव सार्थक केले. ती विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्रोत आहे.
धनश्रीच्या शिक्षणासाठी वडिलांनी घेतले कर्ज!
धनश्रीची धडपड, परदेशात शिक्षण घेण्याची तळमळ पाहून, तिच्या वडिलांनी तब्बल ३५ लाख रुपये बँकेतून कर्ज घेतले आणि तिचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांचा विश्वास तिने सार्थ ठरविला. धनश्रीची लहान बहीण आदितीसुद्धा बीएससीला शिकत आहे.
या उत्पादन निर्मितीत असणार सहभाग!
धनश्रीची अॅमेझॉन कंपनीत निवड झाल्यावर ती सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणार असून, समाजाचे जीवन सुखकर करण्यासाठी कंपनीकडून निर्माण करण्यात येणाऱ्या उत्पादन निर्मितीमध्ये धनश्रीचा सहभाग राहणार आहे.