अकोला : बारावीच्या परीक्षेत मुलीच आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 11:05 AM2022-06-09T11:05:55+5:302022-06-09T11:08:49+5:30
HSC RESULT : यंदाही बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये जिल्ह्यात मुलींनीच आघाडी मिळविली आहे.
अकोला : राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता बारावीचा निकाल ८ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. यंदाही बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये जिल्ह्यात मुलींनीच आघाडी मिळविली आहे. अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.८४ टक्के लागला असून, यात मुलींची टक्केवारी ९७.१५ टक्के एवढी आहे. यंदा झालेल्या परीक्षेसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र दिल्यामुळे निकालाची उत्सुकता अधिक होती. कोरोनामुळे गतवर्षी बारावीची परीक्षा घेण्यात आली नव्हती. त्यामुळे मूल्यांकनाच्या आधारे बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा मात्र, बदल करीत बारावीची परीक्षा शाळेतच घेतल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले होते. जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी १३ हजार ९७६ मुले, १२ हजार ०७१ मुली अशा एकूण २६ हजार ४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ९१७ मुले व १२ हजार ३० मुली अशा एकूण २५ हजार ९४७ विद्यार्थ्यांनी १८० केंद्रांवरून परीक्षा दिली हाेती. यंदा शाळांमध्ये परीक्षा झाल्यामुळे निकाल कसा लागतो याकडे सर्व शाळांचे लक्ष लागले होते. एकंदरीतच बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा उत्कृष्ट निकाल लागला आहे. या निकालामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींनी अपेक्षेनुसार आघाडी मिळविली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा सरस आहे. बारावीच्या परीक्षेत १३ हजार १८१ मुले तर ११ हजार ६८८ मुली उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात तब्बल १०७८ विद्यार्थी नापास झाले आहेत. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा दरवर्षीप्रमाणे भरघोस निकाल लागला असून, विज्ञान शाखेचे ९९.१२ टक्के विद्यार्थी पास झाले. त्या खालोखाल वाणिज्य शाखेचा ९७.०६ टक्के, कला शाखेचा निकाल ९१.९० टक्के तर व्होकेशनल शाखेचा निकाल ९१.११ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांचा निकाल उत्कृष्ट लागला असून, विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
असा लागला निकाल
तालुका मुले मुली टक्केवारी
अकोला ५२६२ ५०५७ ९६.७७
अकोट १७७४ १५९६ ९७.१७
तेल्हारा ६६२ ८२४ ८२.२४
बार्शीटाकळी १६०३ १०७४ ९७.३४
बाळापूर १३९० १२०१ ९६.८५
पातूर १४०१ ९७९ ९६.८४
मूर्तिजापूर १०८९ ९५७ ९६.१९
निकालात बार्शीटाकळी तालुका अव्वल
बारावीच्या निकालात जिल्ह्यातून बार्शीटाकळी तालुक्याने अव्वल स्थान पटकावले. बार्शीटाकळी तालुक्याचा निकाल ९७.३४ टक्के लागला आहे तर अकोट तालुक्याचा निकाल ९७.१७ टक्के लागला आहे. त्यानंतर पातूर तालुका ९६.८६ टक्के तर अकोला तालुक्याचा निकाल ९६.७७ टक्के लागला आहे.