अभ्यागत मंडळाच्या बैठकीत सर्वोपचारमधील प्रश्नांवर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:18 PM2018-05-08T15:18:23+5:302018-05-08T15:18:23+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विविध प्रश्नांवर अभ्यागत मंडळाच्या बैठकीत मंथन करण्यात आले.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विविध प्रश्नांवर अभ्यागत मंडळाच्या बैठकीत मंथन करण्यात आले. रुग्णांना सातत्याने भेडसावणाऱ्या समस्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खा.संजय धोत्रे यांनी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला दिले.
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी अभ्यागत मंडळाच्या बैठकीचे आयोजन आज, ७ मे रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. खा.संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मंडळाचे सदस्य आमदार गोवर्धन शर्मा, विशेष निमंत्रित आमदार रणधीर सावरकर, अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, उप-अधिष्ठाता डॉ.के.एस.घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्यामकुमार सिरसाम, अभ्यागत मंडळाचे सदस्य प्रबोध देशपांडे, अॅड.गिरीश गोखले, दीपक मायी, चन्ने, लता गावंडे, वर्षा धानोरकार, रमेश अलकरी, मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन दिघावकर, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. डॉ.घोरपडे यांनी गत पाच वर्षात सर्वोपचार रुग्णालयातील आंतररुग्ण, बाह्यरुग्ण व झालेल्या शस्त्रक्रियांची माहिती दिली. सर्वोपचार रुग्णालय परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आदेश खा.संजय धोत्रे यांनी दिले. आ.गोवर्धन शर्मा यांनी रुग्णांच्या सुविधांचा मुद्दा उपस्थित केला. आ.रणधीर सावरकर यांनी नेत्र रुग्णांच्या शस्त्रक्रियांना दिरंगाई होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून त्यात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत रुग्णांच्या नातेवाइकांसाठी पास प्रणाली लागू करण्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये आ.रणधीर सावरकर यांनी रुग्णांसोबत दोन नातेवाईक राहण्यासोबतच भेटायला येणाºयांसाठी किमान दोन तासाचा वेळ ठेवण्याची सूचना केली. त्यानुसार रुग्णांना भेटायला येणाºयांसाठी दोन तासाची वेळ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मंडळाचे सदस्य प्रबोध देशपांडे व अॅड.गिरीश गोखले यांनी गत सभांमधील निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासंदर्भात विचारणा केली. सर्वोपचार रुग्णालयासाठी जनसंपर्क अधिकारी पदाचा प्रभार देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. बैठकीमध्ये भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निरीक्षणात आलेल्या त्रुटींची पूर्तता करणे, महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया, बांधकामाची माहिती, रिक्त, मंजूर पदे व वाढीव पदांची निर्मिती करणे यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक होणार
रिक्त, मंजूर पदे, वाढीव पदांची निर्मिती, निवासी वैद्यकीय अधिकाºयांकडून करारपत्र लिहून घेणे आदी सर्वोपचार रुग्णालयातील धोरणात्मक मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खा.संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. यासाठी आ.रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेतला आहे.