‘जीएमसी’त महागडी वैद्यकीय उपकरणे धूळ खात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:57 PM2019-11-16T12:57:20+5:302019-11-16T12:57:38+5:30
तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने सर्वोपचारमधील डायलिसीस केंद्र बंद पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अपुरे मनुष्यबळ हे सर्वोपचार रुग्णालयातील सर्वात मोठी व गंभीर समस्या आहे. परिणामी, रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचे नेहमीच समोर येते. अशातच डायलिसीस, ईसीटी अन् ईईजीसारख्या वैद्यकीय उपकरणांना हाताळण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ही सेवा पूर्णत: ठप्प पडली आहे.
पश्चिम विदर्भातले मोठे वैद्यकीय हब म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाची ओळख आहे. म्हणूनच अकोल्यासह जवळपासच्या जिल्ह्यातील गंभीर रुग्ण येथे उपचारासाठी येतात; परंतु या ठिकाणी रुग्णांवर उपचारासाठी पुरेसे मनुष्यबळच उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. परिणामी, अनेक वैद्यकीय सुविधा अडचणीत सापडल्या असून, डायलिसीस ही त्यातील सर्वात महत्त्वाची वैद्यकीय सुविधा आहे. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने सर्वोपचारमधील डायलिसीस केंद्र बंद पडले आहे.
वैद्यकीय उपकरण हाताळण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्याने महागळे वैद्यकीय उपकरणे जवळपास वर्षभरापासून धूळ खात आहेत. त्यामुळे सुविधा उपलब्ध असूनही किडनी आणि थॅलिसिमीयाच्या रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. हीच बाब मनोरुग्ण विभागातील ईसीटी आणि ईईजी या वैद्यकीय उपकरणांच्या बाबतीत झाली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातूनच नव्हे, तर जवळपासच्या जिल्ह्यातील येणाऱ्या अनेक रुग्णांना अर्धवट उपचार घेऊन खासगी रुग्णालयात जावे लागते.
डॉक्टरांची नियुक्ती केली; पण उपकरण बंद
सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागामध्ये सात वर्षांपूर्वी शॉक थेरेपीसाठी ईसीटी मशीन उपलब्ध करण्यात आली होती. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर असूनही गत सात वर्षांपासून ईसीटी मशीनचा उपयोग करण्यात आला नव्हता. यासंदर्भात महाराष्ट्र रुग्णसेवक संघटनेचे महानगराध्यक्ष आशिष सावळे यांनी आॅनलाइन तक्रार केल्यानंतर जीएमसीला जाग आली. काही दिवसांपूर्वी तब्बल सात वर्षांनी हे वैद्यकीय उपकरण उपयोगात आणल्या गेले; मात्र आता उपकरण बिघडल्याने पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.
वर्ष झाले; पण तज्ज्ञ डॉक्टरच नाही
सर्वोपचार रुग्णालयात मेडिसीन विभागात केवळ तीन डॉक्टर कार्यरत आहेत. यामध्ये नेफ्रॉलॉजीस्टचे पद रिक्त आहे. नेफ्रॉलॉजीस्ट नसल्याने गत वर्षभरापासून डायलिसीस केंद्र ठप्प पडले आहे.