परिचारिकांच्या रिक्त जागांपैकी ३० जागांचा प्रश्न लागणार मार्गी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 02:30 PM2020-01-04T14:30:35+5:302020-01-04T14:30:40+5:30
सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांची ५४ पदे रिक्त असून, यातील ३० पदे भरण्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांची ५४ पदे रिक्त असून, यातील ३० पदे भरण्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य सेवेवरील ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याने परिचारिकांना दिलासा मिळणार आहे.
सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत वैद्यकीय सेवेचा आधार असलेल्या परिचारिकांची संख्या एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे. येथे मंजूर ३८३ पदांपैकी ३२९ पदे भरण्यात आलेली असून, इतर ५४ पदे रिक्त आहेत. सर्वोपचार रुग्णालयातील रुग्ण संख्या लक्षात घेता प्रत्येक वॉर्डात किमान १५ परिचारिकांची गरज आहे; पण सध्या एका वॉर्डात केवळ पाच परिचारिका रुग्ण सेवा देत आहेत. क्रिटिकल सेंटर, अपघात कक्ष, अतिदक्षता कक्षात मात्र १२ परिचारिका रुग्ण सेवा देत आहेत. त्यामुळे रुग्ण सेवेवर प्रचंड ताण येत आहे. दरम्यान, १९०० परिचारिकांच्या जागा तत्काळ भराव्या, यासाठी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता; मात्र अद्यापही हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. असे असले तरी रिक्त असलेल्या ५४ पदांपैकी ३० पदांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाºयाने दिली.
मंजूर पदे - ३८३
भरलेली पदे - ३२९
रिक्त पदे - ५४
अशी आहे स्थिती
- सर्वोपचारमधील एकूण खाटा ७१९
- दररोज ७०० रुग्णांवर वॉर्डात उपचार
- १५०० पेक्षा जास्त रुग्ण बाह्य रुग्ण विभागात
- ३० महिलांची होते दररोज प्रसूती
- ३ रुग्णांमागे हवी एक परिचारिका.
कामाचा ताण
आयसीयू, पीबीयूमध्ये एका रुग्णासाठी एक परिचारिका आवश्यक आहे; मात्र येथे २० रुग्णांमागे दोन परिचारिकांना काम करावे लागते. यावरून परिचारिकांवर असलेल्या कामाचा ताण लक्षात येतो.