Akola GMC : आंतरवासिता डॉक्टरांनी पुकारले आंदोलन; अधिष्ठातांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 07:20 PM2021-05-05T19:20:31+5:302021-05-05T19:20:57+5:30
Akola GMC: मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देणार असल्याचेही आंतरवासीता डॉक्टरांनी स्पष्ट केले.
अकोला: अत्यल्प वेतनात १२ तासांपेक्षा जास्त रुग्णसेवा देणाऱ्या आंतरवासीता डॉक्टरांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने डॉक्टरांना वाढीव कोविड भत्त्यासह आवश्यक सर्वच सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी बुधवारी आंतरवासीता डॉक्टरांनी निदर्शने देत आंदोलन पुकारले. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देणार असल्याचेही आंतरवासीता डॉक्टरांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून बहुतांश गंभीर रुग्ण हे सर्वोपचार रुग्णालयात संदर्भीत केले जातात. या रुग्णांच्या उपचाराचा बहुतांश भार येथील आंतरवासीता डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. अशा परिस्थितीत अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी २० विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात जाण्याची परवानगी दिल्याने कामाचा ताण आणखी वाढल्याचा रोष व्यक्त करत आंतरवासीता डॉक्टरांनी बुधवारी दुपारच्या सुमारास अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर निदर्शने दिली. मुंबई, पुणे येथील कोविड रुग्णसेवा देणाऱ्या आंतरवासीता डॉक्टरांना ५० हजार रुपये मानधन दिले जाते, मात्र अकोल्यात केवळ ११ हजार रुपयेच का, असा सवाल यावेळी आंतरवासीता डॉक्टरांनी अधिष्ठाता यांना केला. केवळ ११ हजार रुपये मानधन आणि १२ तासांपेक्षा जास्त रुग्णसेवा करुन घेतली जाते, अशा परिस्थितीत कोविडची लागण झाल्यास आंतरवासीता डॉक्टरांना खाटा देखील उपलब्ध होतील की नाही, याची हमी नसल्याचे सांगत यावेळी आंदोलन कर्त्या आंतरवासीता डॉक्टरांनी रोष व्यक्त केला.
या आहेत प्रमुख मागण्या
मुंबई व पुण्यामध्ये कार्यरत आंतरवासीता डॉक्टरांना गत वर्षी ५० हजार रुपये मानधन देण्यात आले होते. त्याच प्रमाणे आम्हालाही ५० हजार रुपये मानधन देण्यात यावे.
शासनाने सर्वच आंतरवासीता डॉक्टरांना विमा कवच प्रदान करावे. कोविड ड्यूटीदरम्यान आजारी पडल्यास उपचाराची सर्वस्वी जबाबदारी शासनाने घ्यावी.