शिकाऊ डॉक्टरांवरच ‘ओपीडी’चा कारभार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 10:49 AM2020-12-05T10:49:24+5:302020-12-05T10:50:37+5:30
Akola News बहुतांश शिकाऊ डॉक्टरच रुग्णांचा उपचार करत असल्याचे आढळून आले.
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत येथे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे येथील रुग्णसंख्येचा भार शिकाऊ डॉक्टरांवरच दिसून येत आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी एक वैद्यकीय अधिकारी वगळल्यास बहुतांश शिकाऊ डॉक्टरच रुग्णांचा उपचार करत असल्याचे आढळून आले. अकोल्यात स्वतंत्र जिल्हा रुग्णालय नाही, शिवाय महापालिकेचेही रुग्णालय नसल्याने जिल्ह्यातील रुग्णसेवेचा संपूर्ण भार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत येथे उपलब्ध मनुष्यबळ अपुरे आहे. बहुतांश वैद्यकीय अधिकारी हे कंत्राटी तत्त्वावर असून, त्यांचा कंत्राट चार ते पाच महिन्यांचा असतो, तर अनेक नियमित पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णसेवेचा भार शिकाऊ डॉक्टरांवर आला आहे. रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर असून, केवळ एका वैद्यकीय अधिकारी वगळल्यास इतर सर्वच डॉक्टर हे शिकाऊ राहतात. मनुष्यबळासाठी जीएमसी प्रशासनातर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे; मात्र प्रशासनाकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याचे दिसून येते.
अपघात कक्ष
सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणारा रुग्ण सर्वप्रथम अपघात कक्षात दाखल होते. येथे प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी संबंधित वाॅर्डात दाखल केले जाते. या ठिकाणी रुग्णांवर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडूनच उपचार केला जातो.
बाह्यरुग्ण विभाग
अपघात कक्षासोबतच बाह्यरुग्ण विभागातही सर्वाधिक डॉक्टर हे प्रशिक्षणार्थी आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांचे प्रमाण कमी असल्याने रुग्णसेवेची मदार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवरच येते.
मेडिसीन
सर्वोपचार रुग्णालयात सर्वाधिक गंभीर परिस्थिती मेडिसन विभागाची आहे. या विभागात नियमित डॉक्टरांची पदे रिक्त असून, मोजक्याच डॉक्टरांवर कारभार चालतो. त्यामुळे या विभागाचाही कारभार प्रशिक्षणार्थींच्या भरवशावर चालत असून, रात्रीच्या वेळी परिस्थिती गंभीर होते.
अतिदक्षता कक्ष
अतिदक्षता कक्षात गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे या ठिकाणी पूर्णवेळ डॉक्टरांची आवश्यकता आहे; मात्र मनुष्यबळाच्या अभावामुळे येथे एक किंवा दोन डॉक्टर सोडल्यास इतर डॉक्टर प्रशिक्षणार्थीच असल्याचे निदर्शनास आले.