अकोला ‘जीएमसी-सर्वोपचार’च्या समस्या मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 02:32 PM2018-08-10T14:32:02+5:302018-08-10T14:42:20+5:30
अकोला : केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण काही अंशी सुटण्याची चिन्हे आहेत.
अकोला : केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण काही अंशी सुटण्याची चिन्हे आहेत. औषधांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी स्थानिक खरेदीची मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची मुंबई येथे भेट घेऊन सर्वोपचार रुग्णालयाच्या समस्या मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ८ सहयोगी प्राध्यापक व १५ सहाय्यक प्राध्यापकांची अशी एकूण २३ पदांची निर्मिती करणे आवश्यक आहे. या पदांची निर्मिती झाल्यानंतर सध्यस्थितीत चालू असलेल्या १० विषयांतील पदव्यूत्तर अभ्यासक्रमासोबत उर्वरित १० विषयांमध्ये पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची निर्मिती होणार आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊन रुग्णसेवांमध्ये आमुलाग्र बदल होणार आहे. यासाठी मुंबईत ७ आॅगस्ट रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
प्रस्ताव शासनाकडे पाठविणार
पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांची २३ पदे रुपांतरीत करणे गरजेच आहे. अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांनी हे पटवून दिल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण खात्याचे प्रधान सचिवांसोबत दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सदर बाबींबाबत निर्देश दिले. यानूसार अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते पदे रुपांतरीत करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरीत शासनाकडे सादर करणार आहेत.
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या समस्या मांडल्या. अत्यंत सकारात्मक झालेल्या या बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी पदे रुपांतरीत करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. औषध खरेदीची मर्यादाही वाढल्याने स्थानिक पातळीवर जास्त प्रमाणातऔषधांची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यक औषधांचा तुटवडा भासणार नाही.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.