मंजूर पदांबाबत अकोला ‘जीएमसी’सोबत दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:41 AM2017-09-05T01:41:03+5:302017-09-05T01:41:20+5:30
आरोग्य सेवा क्षेत्रात विदर्भातील दुसर्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर असलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाला मंजूर पदांबाबत शासनाकडून दुजाभाव होत असल्याचे येथे मंजूर असलेल्या पदांवरून दिसून येत आहे. संलग्नित असलेले मोठे रुग्णालय व एमबीबीएसच्या १५0 जागा असतानाही अकोला येथे एमबीबीएसच्या प्रत्येकी १00 जागा असलेल्या चंद्रपूर व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांपेक्षाही कमी पदे मंजूर आहेत. पदे वाढवून मिळण्यासाठी ‘जीएमसी’ प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जात असला, तरी त्याला यश मिळत नसल्याचे वास्तव आहे.
अतुल जयस्वाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आरोग्य सेवा क्षेत्रात विदर्भातील दुसर्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर असलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाला मंजूर पदांबाबत शासनाकडून दुजाभाव होत असल्याचे येथे मंजूर असलेल्या पदांवरून दिसून येत आहे. संलग्नित असलेले मोठे रुग्णालय व एमबीबीएसच्या १५0 जागा असतानाही अकोला येथे एमबीबीएसच्या प्रत्येकी १00 जागा असलेल्या चंद्रपूर व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांपेक्षाही कमी पदे मंजूर आहेत. पदे वाढवून मिळण्यासाठी ‘जीएमसी’ प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जात असला, तरी त्याला यश मिळत नसल्याचे वास्तव आहे.
पश्चिम विदर्भाचे ‘ट्रॉमा केअर सेंटर’ अशी ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाचा या भागातील रुग्णांना मोठा आधार आहे. मध्य रेल्वेचे जंक्शन आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील महत्त्वाचे शहर असल्याने अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात अकोला जिल्हय़ासोबतच लगतच्या बुलडाणा, वाशिम, हिंगोली व अमरावती जिल्हय़ातील दर्यापूर, अचलपूर तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. येथील बाहय़ उपचार विभागात दररोज १२00 ते १५00 पर्यंत रुग्णांची नोंदणी होते. तसेच येथे दाखल होणार्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या १५0 जागा आहेत. भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय)च्या मानकानुसार या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयात डॉक्टरपासून ते सफाई कामगारांपर्यंतची २२३६ पदे असणे गरजेचे आहे, तर वैद्यकीय महाविद्यालयात १११५ पदे असावयास हवी. परिस्थिती मात्र वेगळीच आहे. येथील रुग्णालयात केवळ ७७३, तर महाविद्यालयात केवळ ३९९ पदे मंजूर आहेत. या मंजूर पदांपैकीदेखील अनेक पदे रिक्त असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार चालविणे जिकरीचे होत आहे, तर दुसरीकडे रुग्णालयातील आरोग्य सेवा बाधित होत आहे.
अकोल्याच्या तुलनेत छोट्या असलेल्या गोंदिया व चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या प्रत्येकी १00 जागाच आहेत. तसेच या महाविद्यालयांशी संलग्नित असलेली रुग्णालयही अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयाच्या तुलनेत छोटी आहेत. परंतु, या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचार्यांची ५१0 पदे मंजूर आहेत, तर रुग्णालयांसाठी प्रत्येकी १0७२ कर्मचार्यांची पदे मंजूर आहेत.
अकोला जीएमसीपेक्षा कमी जागा असताना चंद्रपूर व गोंदिया जीएमसीला एवढी पदे मंजूर होऊ शकतात, तर अकोला जीमएसीला पदे वाढवून का मिळत नाही, हा संशोधनाचा ठरत आहे.
पाठपुरावा ठरतोय अपयशी!
रुग्णसेवा आणि महाविद्यालय चालविण्यात रिक्त पदांचा खोडा येत असल्याने सवरेपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील मंजूर पदांची संख्या वाढवून मिळावी, तसेच रिक्त पदे भरावी, यासाठी प्रशासनाकडून गत दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठीचे प्रस्तावही शासन दरबारी पाठविण्यात आले आहेत; परंतु या प्रयत्नांना यश येत नसल्याचे चित्र आहे.