जीएमसीत विद्यार्थिनीचा छळ; विशेष पथकाद्वारे चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 02:23 PM2019-10-15T14:23:46+5:302019-10-15T14:23:53+5:30
चौकशीमुळे महाविद्यालय प्रशासनासोबतच सहकारी विद्यार्थ्यांचेही धाबे दणाणले आहेत.
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सौजन्याची वागणूक मिळत नसल्याची तक्रार विद्यापीठाकडे केल्यानंतर उच्चस्तरीय समितीने सोमवारी चौकशीला सुरुवात केली. यावेळी समितीने प्रामुख्याने विभाग प्रमुखांसह सहकारी विद्यार्थ्यांची चौकशी केली. या चौकशीमुळे महाविद्यालय प्रशासनासोबतच सहकारी विद्यार्थ्यांचेही धाबे दणाणले आहेत.
गत आठवड्यापासून शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील दोन विद्यार्थिनींसोबत सहकारी विद्यार्थ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळत नसल्याचा चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकारामुळे सहकारी विद्यार्थ्यांकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनींनी महाविद्यालय प्रशासनासोबतच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे संचालक तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतरही विद्यार्थिनींसोबत सुरू असलेला प्रकार न थांबल्याने उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली. या समितीने सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चौकशीला सुरुवात केली. यावेळी स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्यामकुमार शिरसाम व डॉ. अपर्णा वाहाने यांची कसून चौकशी करण्यात आली. शिवाय विद्यार्थिनींचा छळ करणाऱ्या सहकारी विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात आली. ही सहा सदस्यीय समिती औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. के.ए. एळीकर यांच्या मार्गदर्शनात चौकशी करत आहे. काही महिन्यांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या रॅगिंगप्रकरणी या विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली होती; परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या विद्यार्थिनींना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा प्रवेशित करण्यात आले. त्यानंतर इतर सहकारी विद्यार्थ्यांकडून त्या विद्यार्थिनींना या प्रकारची वागणूक दिली जात आहे.
समितीने केली चित्रफितीची पाहणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या या प्रकारसंदर्भात विविध स्तरातून तक्रारी होत आहेत. चौकशीदरम्यान समितीने इतर तक्रारकर्त्यांचीही चौकशी केली. यावेळी महाविद्यालयात झालेल्या रॅगिंग प्रकरणाची चित्रफीत समितीला दाखविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डॉ. वाहानेंचा पदभारही काढला
स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागातील विद्यार्थिनींसोबत हा प्रकार सुरू असतानाच विभाग प्रमुख डॉ. अपर्णा वाहाने यांचा पदभार काढण्यात आला आहे. विद्यार्थिनींसोबत सुरू असलेल्या प्रकारासंदर्भात तक्रार आल्यावर विद्यापीठात महत्त्वाची बैठक पार पडली होती. यासाठी विभाग प्रमुख डॉ. वाहने यांनादेखील बोलाविण्यात आले होते; परंतु त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली नसल्याची माहिती आहे. यासोबतच त्यांच्याविरुद्ध काही तक्रारीही विद्यापीठाकडे गेल्याने त्यांचा पदभार काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.