नागपूरच्या समीक्षा समितीमार्फत होणार अकोला ‘जीएमसी’चे सर्वेक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:06 AM2020-05-30T10:06:43+5:302020-05-30T10:06:52+5:30
नागपूर येथील समीक्षा समिती अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, एकट्या ‘जीएमसी’वर ताण वाढला आहे. रुग्णालय प्रशासनानेही शासनाकडे मनुष्यबळाची मागणी केली होती. नागपूर येथील समीक्षा समिती अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आहे. सर्वेक्षणात परिस्थिती नियंत्रणात सोबतच मनुष्यबळाचा मुद्दाही उपस्थित होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
गत अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन शासनाकडे मनुष्यबळाची मागणी करीत आहे; मात्र आतापर्यंत शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. अशातच गत महिनाभरात कोरोनाआधी त्यांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा संपूर्ण ताण सर्वोपचार रुग्णालयावर आला आहे. परिणामी, मनुष्यबळाची कमी रुग्णालय प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने पुन्हा एकदा शासनाकडे मनुष्यबळाची मागणी केल्याची माहिती आहे. या पृष्ठभूमीवर शासनाकडून नागपूर येथून एक समीक्षा समिती पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही समिती सर्वोपचार रुग्णालयाचा संपूर्ण आढावा घेणार असून, आवश्यक बदल आणि रुग्णांना चांगल्या सुविधा कशा पुरविण्यात येतील, यावर मंथन करणार आहे. शिवाय, किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे, यावरही प्रामुख्याने विचार केला जाणार असल्याची माहिती आहे. सर्वोपचार रुग्णालयाचा आढावा घेऊन ही समिती आपला अहवाल शासनाकडे पाठविणार आहे. त्यानंतर शासन काय निर्णय घेईल, याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष लागून आहे.
-हे असणार प्रमुख मुद्दे!
उपचार पद्धतीत आवश्यक बदल
नवीन सुधारणा करता येतील का?
रुग्णांना कशाप्रकारे चांगल्या सुविधा देता येतील?
सद्यस्थितीत किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे?
३० ते ३५ डॉक्टरांची मागणी
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर घोरपडे यांनी शासनाकडे ३० ते ३५ डॉक्टरांची मागणी केली आहे. त्यानुषंगाने नागपूर येथील समीक्षा समिती आढावा घेऊन निर्णय घेणार आहे.