अकोला ‘जीएमसी’च्या सहयोगी प्राध्यापकाची आंतरराष्ट्रीय ‘फायमर फेलोशिप’साठी निवड
By atul.jaiswal | Published: January 6, 2018 01:19 PM2018-01-06T13:19:52+5:302018-01-06T13:23:19+5:30
अकोला :अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील ‘फाउंडेशन फॉर अॅडव्हान्समेंट आॅफ इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन रिसर्च’ (फायमर) या संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाºया ‘फेलोशिप’साठी यंदा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिल बी. वारकर यांची निवड झाली आहे.
अकोला : गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील ‘फाउंडेशन फॉर अॅडव्हान्समेंट आॅफ इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन रिसर्च’ (फायमर) या संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘फेलोशिप’साठी यंदा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिल बी. वारकर यांची निवड झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या ‘फेलोशिप’साठी दरवर्षी संपूर्ण भारतातून केवळ १० जणांची निवड केली जाते. यावर्षी भारतातून निवडलेल्या १० जणांमध्ये अकोला ‘जीएमसी’चे डॉ. वारकर हे महाराष्ट्रातील एकमेव प्राध्यापक आहेत.
अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथील ‘फायमर’ संस्था ही वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांना फेलोशिप प्रदान करीत असते. या फेलोशिपसाठी दरवर्षी दक्षिण-पूर्व आशियातून १६ वैद्यकीय प्राध्यापकांची निवड केली जाते. यामध्ये १० भारतातील, तर उर्वरित सहा जण हे दक्षिण-पूर्व आशियातील इतर देशांमधून निवडले जातात. वर्ष २०१८ साठी भारतातून निवडल्या गेलेल्या १० वैद्यकीय प्राध्यापकांमध्ये अकोला ‘जीएमसी’मध्ये शरीरक्रियाशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. अनिल वारकर यांचा समावेश आहे. या फेलाशिपसाठी निवड झालेले डॉ. अनिल वारकर हे महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधून एकमेव ठरले आहेत. आपल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाची निवड या फेलोशिपसाठी व्हावी, याकरिता अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते हे गत तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. अखेर यावर्षी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. डॉ. वारकर यांची निवड झाल्याबद्दल डॉ. राजेश कार्यकर्ते, उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला.
काय आहे फेलोशिप?
‘फायमर’ ही संस्था दरवर्षी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांना फेलोशिप देत असते. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकविणारे प्राध्यापक हे त्यांच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे आणि नवीन पद्धतीने कसे शिकवू शकतात, यासाठी फायमर फेलोशिप अंतर्गत तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येते. दक्षिण-पूर्व आशियासाठी लुधियाना येथील ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय हे प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१८ आणि ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१९ अशी दोन वेळा प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. या दरम्यानच्या काळात निवड झालेल्या प्राध्यापकांना आॅनलाइन प्रशिक्षण दिले जाते.