जिल्ह्यात उष्णतेची लाट, पारा ४२.६ अंशावर!
By रवी दामोदर | Published: March 29, 2024 05:05 PM2024-03-29T17:05:53+5:302024-03-29T17:07:12+5:30
जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे.
रवी दामोदर, अकोला : जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात सलग दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. शुक्रवार जिल्ह्याचे तापमान विदर्भातून सार्वाधिक असून, पारा ४२.६ अंशावर होता.
जिल्ह्यात सलग उन्हाचे चटके वाढत असल्याने शहरात दुपारच्या सुमारास वर्दळ कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे. पुढील एप्रिल आणि मे हे ऐन उन्हाळ्याचे दोन महिने नागरिकांसाठी चांगलेच ‘ताप’दायी ठरणार असल्याचे संकेत आहेत. हवामान विभागाने पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अलीकडच्या काळात हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होऊ लागला आहे. याचा प्रतिकूल परिणाम शेतीबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ लागला आहे. डिसेंबर महिन्यापासूनच जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणावर आटू लागले आहेत. सध्या तापमानाचा पारा राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक अकोल्यात नोंदविला जात आहे. मार्च महिन्यानंतर उकाड्यात अधिक वाढ होते. मात्र, यंदा मार्च महिन्यातच उकाडा जाणवत आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी ढगाळ वातावरण -
प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवारी व शनिवारी जिल्ह्यात उष्णतेची लाट सांगितली आहे,परंतू शुक्रवारी सकाळच्या सुमारास ग्रामीण भागात ढगाळ वातावरण दिसून आला. शेजारील बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यातही अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ढगाळ वातावरण दिसताच बळीराजाने रब्बी ज्वारी व गहू पिकाच्या काढणीला वेग दिला आहे.