विदर्भात अकोल्याचे तापमान पुन्हा सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 10:17 AM2021-04-10T10:17:58+5:302021-04-10T10:18:38+5:30
Akola has the highest temperature in Vidarbha : शुक्रवारी तापमान ४१.५ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले.
अकोला : मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्याचा पारा घटला आहे. शुक्रवारी तापमान ४१.५ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले; मात्र पाऱ्यात घट झाली असली तरी हे विदर्भातील सर्वाधिक तापमान होते.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा सुरू आहे. जिल्ह्याचा पारा ४२.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे दिवसा गर्दी कमी पहावयास मिळाली; परंतु सलग दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे उष्णतेची लाट कमी झाली आहे. उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अकोल्यात विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा पारा ४१.५ अंश सेल्सिअसवर नोंदविल्या गेला. या पाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सहा दिवसांत तिसऱ्यांदा विदर्भात सर्वाधिक तापमान
शुक्रवारी विदर्भात सर्वाधिक तापमान अकोल्यात नोंदविल्या गेले. या आधी ४ एप्रिल रोजी ४२.१ व ७ एप्रिल रोजी ४२.९ अंश सेल्सिअस तापमान विदर्भात सर्वाधिक होते. या उन्हाळ्यात तिसऱ्यांदा अकोल्याचा पारा विदर्भात सर्वाधिक होता.
तापमानात घट; उकाडा कायम
जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे. तरी वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कायम असल्याने दिवसभर उकाडा जाणवत होता. पुढील दोन दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.