Akola: अतिवृष्टीचा सर्व्हे चुकीचा; डाबकी गावकऱ्यांची तहसील कार्यालयात धडक
By रवी दामोदर | Published: August 28, 2023 06:02 PM2023-08-28T18:02:18+5:302023-08-28T18:02:59+5:30
Akola: डाबकी (भौरद) येथेही अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासंदर्भात महसूल विभागामार्फत सर्व्हे करण्यात आला आहे, परंतु हा सर्व्हे चुकीचा झाल्याचा आरोप करीत डाबकी (भौरद) येथील नागरिकांनी तहसील कार्यालयात धडक दिली.
- रवी दामोदर
अकोला - अतिवृष्टीमुळे खरिप हंगामातील पिकांसह घरांची पडझड झाली होती. डाबकी (भौरद) येथेही अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासंदर्भात महसूल विभागामार्फत सर्व्हे करण्यात आला आहे, परंतु हा सर्व्हे चुकीचा झाल्याचा आरोप करीत डाबकी (भौरद) येथील नागरिकांनी सोमवार, दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास तहसील कार्यालयात धडक दिली. याप्रसंगी संतप्त नागरिकांनी तहसीलदारांची भेट घेऊन पुन्हा सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली.
जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांना फटका बसला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. डाबकी (भौरद) परिसरातही झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांत पाणी शिरले होते. घरातील अन्नधान्यांसह साहित्यांचे नुकसान झाले होते. यासंदर्भात महसूल विभागामार्फत सर्व्हे करण्यात आला. परिसरात खऱ्या नुकसानग्रस्तांना डावलले असून, चुकीचा सर्व्हे केल्याचा आरोप करीत डाबकी (भौरद) येथील नागरिकांनी तहसील कार्यालयात धडक दिली. यावेळी प्रभारी तहसीलदार शिंदे व मंडळ अधिकारी माहोरे यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांच्यासह विलास मोरे, आशिष मोरे, गजानन मोरे, मुकुंद मोरे, संजय मोरे, देवानंद मोरे, रामधन मोरे, किशोर मोरे, गंगुबाई मोरे, जानकाबाई घुगे, नामदेव ठाकरे, संगीता दहिवाले, बाबाराव गवई, प्रमोद सदाशिव, दुर्गा मोरे, भास्कर मोरे, मंदा वानखडे, सागर इंगळे, सुशीला इंगळे, मंगेश जगताप, मंगेश मोरे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो)