अकोला: खिरपुरी बुद्रुक येथे घराला आग; लाखोंचे नुकसान
By रवी दामोदर | Published: May 7, 2024 12:07 PM2024-05-07T12:07:00+5:302024-05-07T12:07:37+5:30
त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांनी घटनास्थळाची पाहणी करीत पंचनामा केला आहे.
अकोला - बाळापुर तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक येथे मंगळवार, दि. ७ मे रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास भर वस्तीत रघुनाथ मसने यांच्या घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरगुती साहित्यासह अन्न-धान्य जळून खाक झाले. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांनी घटनास्थळाची पाहणी करीत पंचनामा केला आहे.
खिरपुरी बु. येथील रघुनाथ भास्कर मसने हे आजाराने त्रस्त असल्याने उपचारासाठी अकोला येथे मुक्कामी गेले होते. त्यांच्या घराला पहाटे ३ वाजता भीषण आग लागून घरातील टीव्ही, कुलर, दिवान, तसेच अन्न-धान्यसाठा, कपडे, रोख रक्कम असा अंदाजे ४ ते ५ लाख रुपयाचे नुकसान झाले. आग लागल्याची समजतात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश केशवराव मसने, प्रवीण नाजूकराव दांदळे या युवकांनी बंद घराचे कुलूप तोडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच महेंद्र जढाळ, एकनाथ पांडुरंग जढाळ, सुरज जढाळ, मनीष दांदळे, विशाल राऊत, दिनेश दांदळे, डॉ. आखरे, सदानंद देविदास उपासने, वामन दांदळे यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
भरवस्तीत लागलेल्या आगीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनेचा पंचनामा करताना तलाठी बेंडे, ग्रामसेवक सूरज बोंडे, कृषी सहायक यांची उपस्थिती होती. रघुनाथ मसने हे किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांना तत्काळ शासकीय मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे