अकोला : एमआयडीसीतील सोयाबीन तेलाच्या कारखान्याला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 06:04 PM2020-04-27T18:04:09+5:302020-04-27T18:08:37+5:30
मनपाच्या अग्नीशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून १६ बंब रिचविल्यानंतर ही आग आटोक्यात आली.
अकोला : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फेज क्रमांक ४ मधील नारायणी फुड ऑईल मीलला (सोयाबीन तेल कारखाना) भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे ५० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मनपाच्या अग्नीशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून १६ बंब रिचविल्यानंतर ही आग आटोक्यात आली असून, पोलिसांचाही मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.
महाराष्ट्र औद्योगीक वसाहत महामंडळाच्या फेज क्रमांक ४ मध्ये अरुण पोद्दार तसेच सुशील पोद्दार यांच्या मालकीचे नारायणी फुड प्रॉडक्शन तथा आॅईल मील आहे. या ठिकाणी सोयाबिन तेलाची निर्मीती करण्यात येते. येथे निर्मित तेलाचे १५ कीलो वजनाचे डबे तसेच अन्य तेलाचे पाकीट ट्रान्सपोर्ट नगरातील गोदामात गोदामात ठेवण्यात आले होते. दरम्यान सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास या गोदामातून धुर बाहेर येत असल्याचे या परिसरातील नागरिकांच्या तसेच काही मजुरांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिस तसेच नारायणी फुड मीलचे संचालक तथा मनपाच्या अग्नीशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर महानगरपालिकेच्या ५ वाहनांव्दारे आणण्यात आलेल्या १६ बंंब पाण्याव्दारे ही आग दुपारी ११ वाजताच्या सुमारास आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे या आगीत तेलाचे डबे, तेल तसेच इतर साहित्य असा एकून ५० ते ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. आग लागल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. मात्र एमआयडीसी पोलिसांनी तातडीने धाव घेउन ही गर्दी पांगवली. या आगीत मोठया प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा विमा असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.