अकोला : डाबकी रोडवरील हायप्रोफाइल कुंटणखान्यावर छापा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:09 AM2018-01-31T01:09:16+5:302018-01-31T01:09:38+5:30
अकोला : बाळापूर रोडवरील पार्वती नगरमध्ये एका घरात सुरू असलेल्या हायप्रोफाइल कुंटणखान्यावर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणावरून श्रीवास मायलेकासह युवतीला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाळापूर रोडवरील पार्वती नगरमध्ये एका घरात सुरू असलेल्या हायप्रोफाइल कुंटणखान्यावर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणावरून श्रीवास मायलेकासह युवतीला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्वती नगरात कस्तुरी गोपाल श्रीवास व गणेश गोपाल श्रीवास यांच्या घरात हायप्रोफाइल कुंटणखाना चालविण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील व डाबकी रोडचे ठाणेदार सुनील सोळंके यांना मिळाली. त्यांनी गत काही दिवसांपासून या घरावर पाळत ठेवली. त्यानंतर सदर घरात युवतींना ने-आण करण्यात येत असल्याची खात्री पटताच मंगळवारी सायंकाळी कस्तुरी श्रीवास हिच्या घरात पोलिसांनी छापा टाकला. या घरातून ग्राहक फरार होण्यात यशस्वी झाला. मात्र, एका पीडित युवतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडले असून, हा गोरखधंदा चालविणार्या कस्तुरी गोपाल श्रीवास व तिचा मुलगा गणेश गोपाल श्रीवास या दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील, डाबकी रोडचे ठाणेदार सुनील सोळंके, जुने शहरचे ठाणेदार गजानन पडघन, सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार अन्वर शेख व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईनंतर एम एच १२ पुणे पासिंगची एक कार पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. या देहविक्री अड्डय़ावर अनेक बड्या व्यक्तींची ये-जा असल्याचेही समोर आले असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
तीन कुंटणखाने उघड
गत एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत अकोला पोलिसांनी शहरातील तीन ठिकाणचेकुंटणखाने उद्ध्वस्त केले आहेत. यामध्ये रिंग रोडवरील समता कॉलनीतील, त्यानंतर जठारपेठेतील ज्योती नगर व आता बाळापूर रोडवरील श्रीवास यांच्या घरातील या कुंटणखान्यावर कारवाई करण्यात पोलिसांना यश आले. यावरून अकोला पोलिसांनी गत काही दिवसांत मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी मोठी कारवाई केल्याचे दिसून येत आहे.
पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशाने या कारवाया करण्यात येत आहेत. पोलीस अधीक्षकांनी अशा अड्डय़ांवर छापेमारी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी गंभीर पावले उचलल्याचे वास्तव आहे.