क्षयरुग्ण शोध मोहिमेत अकोला राज्यात दुसऱ्यास्थानी! पुणे जिल्हा अव्वल
By प्रवीण खेते | Published: April 27, 2023 05:06 PM2023-04-27T17:06:33+5:302023-04-27T17:06:46+5:30
काही महिन्यांपूर्वी राज्यात क्षयरूग्ण शोध मोहीम राबविण्यात आली.
अकोला: काही महिन्यांपूर्वी राज्यात क्षयरूग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला रुग्ण शोधण्याचे वार्षिक उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये सर्वोत्तम कामगीरी पुणे जिल्ह्याने तर क्रमांक दोनची कामगीरी अकोला जिल्ह्याने बजावल्याचे आकडे समोर आले आहे. विभागात मात्र, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याची टक्केवारी घसरल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने ठेवले आहे.
या अनुषंगाने देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षयरुग्ण शोध मोहीम आहे. या अंतर्गत राज्यात प्रत्येक जिल्ह्याला क्षयरुग्ण शोधण्याचे वार्षिक उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टानुसार, जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा घरोघरी जावून क्षयरुग्णांचा शोध घेत आहे. मागील तीन महिन्यात राज्यभरात जिल्हा स्तरावर ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सर्वाधिक क्षयरुग्ण शोधून काढत पुणे जिल्ह्याने विशेष कामगिरी बजावली. दुसऱ्या स्थानावर अकोला जिल्हा आहे.
अकोला आरोग्य विभागाला १४७० रुग्ण शोधण्याचे वार्षिक उद्दिष्ट हाेते. त्यापैकी सुमारे ४०० रुग्ण शोधण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या सुमारे २७ टक्के आहे. तर पुणे जिल्ह्याला ८ हजार ५०० क्षयरुग्ण शोधण्याचे वार्षिक उद्दिष्ट होते. त्यापैकी पुणे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने २,४४८ म्हणजेच सुमारे २९ टक्के रुग्ण शोधून राज्यात सर्वोत्तम कामगीरी बजावल्याची माहिती आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आली.
तिसऱ्या स्थानी विदर्भातील पाच जिल्हे
क्षयरुग्ण शोध मोहिमेंतर्गत आराेग्य यंत्रणेमार्फत घरोघरी जावून क्षयरुग्णांचा शोध घेत त्यांच्यावर उपचार सुरू केले. राज्यात पुणे आणि अकोल्यानंतर तिसऱ्या स्थानी विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. यामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आाहे. या पाचही जिल्ह्यांनी एकूण उद्दिष्टाच्या २६ टक्के कामगिरी बजावली. यामध्ये परभणी जिल्ह्याचा देखील समावेश आहे.
२०२५ पर्यंत देश क्षयराेग मुक्त करण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने ठेवले आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून क्षय रुग्ण शोध मोहीम आहे. तुमच्या कुटुंबातही कोणाला क्षयरोग असेल, तर तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून आवश्यक चाचण्या आणि उपचार सुरू करावेत.
- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा क्षयरोग अधिकारी, अकोला