अकोला : आरोप-प्रत्यारोपांत ढसढसा रडले समाजकल्याण सहायक आयुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:38 AM2018-02-10T01:38:02+5:302018-02-10T01:38:39+5:30
अकोला : समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयातील महिला कर्मचार्याच्या छळ प्रकरणात याच कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास अटक करण्यात आल्याच्या मुद्यावर संबंधित महिला कर्मचारी आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांच्यात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांत सहायक आयुक्त यावलीकर ढसढसा रडल्याचा प्रकार शुक्रवारी पत्रकार परिषदेत घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयातील महिला कर्मचार्याच्या छळ प्रकरणात याच कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास अटक करण्यात आल्याच्या मुद्यावर संबंधित महिला कर्मचारी आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांच्यात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांत सहायक आयुक्त यावलीकर ढसढसा रडल्याचा प्रकार शुक्रवारी पत्रकार परिषदेत घडला.
गोंदिया जिल्हय़ातील अर्जुनी मोर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाची माहिती देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी संमेलनाची माहिती दिली. त्यानंतर समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयातील महिला कर्मचार्याच्या छळ प्रकरणात याच कार्यालयातील वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे यांना गत ७ फेब्रुवारी सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. या मुद्यावर सहायक आयुक्त यावलीकर यांना पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली असता, यासंदर्भात संबंधित महिला कर्मचार्याकडून माझ्याकडे कोणतीही लेखी स्वरूपात तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगत, सहायक आयुक्तांनी संबंधित महिला कर्मचार्यास पत्रकार परिषदेत बोलावले. वरिष्ठ लिपिकाकडून छळ होत असल्याची तक्रार मी सहायक आयुक्तांकडे दिली आहे. माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, साहेब (सहायक आयुक्त) छळ करणार्या वरिष्ठ लिपिकास पाठीशी घालत आहेत, असा आरोप संबंधित महिला कर्मचार्याने यावेळी केला. माझ्याकडे लेखी तक्रार प्राप्त नसून, वरिष्ठ लिपिकास पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. छळाच्या प्रकरणात संबंधित वरिष्ठ लिपिकाविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात आली असून, पोलीस विभागाच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त यावलकीर यांनी यावेळी सांगितले. या मुद्यावर सहायक आयुक्त यावलीकर आणि संबंधित महिला कर्मचार्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, ‘तुम्ही माझ्या आईसारख्या आहात’, असे सहायक आयुक्तांनी म्हटल्यावर ‘तुमच्या आईचा छळ झाला असता, तर तुम्हाला काय वाटले असते’, असा प्रश्न संबंधित महिला कर्मचार्याने सहायक आयुक्तांना केला. ‘आई’चा उल्लेख करताच सहायक आयुक्त यावलीकर यांच्या डोळ्यांत अश्रू आले आणि ते ढसढसा रडू लागले. रडल्याने त्यांचे डोळेही लालबुंद झाले होते.
माझ्या ‘आई’ला बोलू नका!
छळ प्रकरणात तक्रारकर्त्या महिला कर्मचार्याने ‘साहेब, ..तुमच्या आईचा छळ झाला असता तर.. असा उल्लेख करताच, ‘माझ्या आईला बोलू नका’, असे समाजकल्याण सहायक आयुक्त यावलीकर यांनी ठणकावून सांगितले.
माझ्या आईने खूप कष्ट केले.. मला घडविले. त्यामुळे माझ्या आईला बोलू नका, असे सांगत सहायक आयुक्त यावलीकर यांच्या डोळ्यांत अश्रू आले आणि ते ढसढसा रडले.