वसुलीचा तगादा लावणाऱ्या सोने तारण , मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईचे संकेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:03 AM2020-04-17T11:03:26+5:302020-04-17T11:03:36+5:30
वसुलीचा तगादा लावणाऱ्या अकोला जिल्ह्यातील २८ कंपनींच्या हालचालीवर लक्ष.
- संजय खांडेकर
अकोला : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लावलेल्या लॉकडाउन दरम्यान कर्ज वसुलीची बळजबरी करीत शासन आदेशाची पायमल्ली करणाऱ्या सोने तारण आणि मायक्रो फायनान्स कंपनीवर आता कारवाई होण्याचे संकेत आहेत. वसुलीच्या नोटीस पाठविणाºया कंपन्यांचा शोध सुरू झाला असून, अकोला जिल्ह्यातील २८ मायक्रो फायनान्स कंपनीवर आता लीड बॅकेने लक्ष केंद्रित केल्याची माहिती आहे.
कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी देशभरात लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका सर्वसामान्य जनतेपासून तर श्रीमंत उद्योजकांना सोसावा लागत आहे. देशाच्या विकास दरावर परिणाम झाला असून, आर्थिक मंदीचा सामना करण्याची वेळ आलेली आहे. या काळात देशभरातील कर्जदारांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने तीन महिन्यांचे ईएमआय आणि त्यावरील व्याजात सुट देण्याची घोषणा केली. आरबीआयनेदेखील त्यास तातडीने मंजुरी दिली आहे. असे असतानादेखील राज्यातील सोने तारणआणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना नोटिसेस आणि एसएमएस पाठविले गेले. त्रासलेल्या कर्जदारांनी ही बाब लोकमतच्या लक्षात आणून दिली. शासन आणि आरबीआयच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे वृत्त लोकमतने १५ एप्रिलच्या अंकात करताच, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. आम्हाला शासनाकडून अद्याप कोणतेही निर्देश न आल्याने वसुलीची प्रक्रिया सुरू ठेवल्याची सारवासारव या कंपन्या करत आहेत. आता शासनाकडून कारवाई होऊ नये म्हणून या कंपन्या बॅक फुटवर गेल्या आहेत.
-लवकरच आरबीआयची गाइडलाइन
सोने तारण आणि मायक्रो फायनान्स कंपनी आरओसी अॅक्टमध्ये असल्या तरी त्यांच्यावर लीड बँक कारवाई करू शकते. तसे निर्देश आले आहेत. अकोला जिल्ह्यात असलेल्या २९ कंपनीवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. जर कोणत्या कर्जदारास नोटीस किंवा एसएमएस येत असेल तर त्यांनी लीड बँकेकडे तक्रार नोंदवावी, त्यानुसार सदर कंपनीवर कारवाई करण्यात येईल. लवकरच यासंदर्भात आरबीआयची गाइडलाइन येत आहे, अशी माहिती अकोला लीड बँक व्यवस्थापक आलोक कुमार तारेनिया यांनी दिली आहे.