अकोला : मळसूर आरोग्य केंद्रातील बाळ दगावल्याची पुन्हा चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:28 AM2017-12-22T01:28:52+5:302017-12-22T01:32:42+5:30
अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेच्या चौकशीचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिल्यानंतर पातूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव व पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी गुरुवारी आरोग्य केंद्राला भेट देऊन, पुन्हा या प्रकरणाची चौकशी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेच्या चौकशीचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिल्यानंतर पातूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव व पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी गुरुवारी आरोग्य केंद्राला भेट देऊन, पुन्हा या प्रकरणाची चौकशी केली. दरम्यान, या घटनेशी संबंधित अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणलेल्या वेदांत सुमीत कंकाळ (वय ४ महिने) या बालकाला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मंगळवारी त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी चौकशी करण्याचा आदेश मंगळवारी रात्री दिला. त्यानुसार, डॉ. विजय जाधव यांनी मळसूर आरोग्य केंद्रात जाऊन संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले. दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश दिल्यानंतर डॉ. जाधव व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेलार यांनी चौकशी केली. या दोन्ही अधिकार्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता भीमकर व इतर कर्मचार्यांशी चर्चा केली.