अकोला : ‘एसपीं’सह ठाणेदाराची चौकशी सुरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:35 AM2020-04-14T10:35:14+5:302020-04-14T10:35:21+5:30
सोमवारी नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी चौकशीस सोमवारी प्रारंभ केला आहे.
अकोला : पोलीस अधीक्षक अमोघ गावकर हे शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देतात, असा आरोप सिटी कोतवालीचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी रविवारी केला होता. या प्रकरणात त्यांनी बदलीची विनंती करताच त्यांची तातडीने बुलडाणा येथे बदली करण्यात आली; मात्र नाईकनवरे यांनी केलेले आरोप व व्हायरल झालेली आॅडियो क्लिप या यासंदर्भाने पोलीस महासंचालकांनी चौकशीचा आदेश दिला होता. त्यानुसार सोमवारी नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी चौकशीस सोमवारी प्रारंभ केला आहे.
आसाम येथील कोरोनाबाधित रुग्णाचा सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणचे सीसी फुटेज जप्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी सिटी कोतवालीचे ठाणेदार नाईकनवरे यांना वारंवार सूचना दिल्या होत्या; मात्र त्यांनी या कामात दिरंगाई केल्याचे या दोघांच्या मोबाइल संभाषणांच्या क्लीपवरुन स्पष्ट होते. त्यामुळे या प्रकरणावरून कोरोनाबाधिताची आत्महत्या आहे की हत्या, या संशयाचे धुके निर्माण झाले आहे. त्या अनुषंगानेही नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कुमार यांनी अकोल्यात दाखल होऊन चौकशी सुरू केली असल्याची माहिती आहे.
सीसी फुटेज जप्तीचा प्रयत्न
या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयातील सीसी फुटेज जप्त करण्याचे प्रयत्न केल्याची माहिती आहे; मात्र पोलीस अधीक्षक आणि ठाणेदार नाईकनवरे यांच्यात झालेले संभाषण हे केव्हाचे आहे, हे समोर आले नसल्याने नेमके सीसी फुटेज कशासंदर्भात जप्त करण्यात येत आहेत, हे स्पष्ट होऊ शकले नाही.