जनता भाजी बाजार, जुन्या बस स्टॅँडच्या जागेवरील प्रकल्पाला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 02:03 PM2020-02-22T14:03:52+5:302020-02-22T14:03:58+5:30
यामागे भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे.
- आशिष गावंडे
अकोला: शहरातील जनता भाजी बाजार तसेच टॉवर चौकातील जुन्या बस स्थानकाच्या जागेवर कमर्शिअल कॉम्पलेक्स उभारण्यासह गांधी जवाहर बगिच्यालगत असणाऱ्या मैदानावर आॅडिटेरिअम हॉलचे निर्माण करण्यासाठी भाजपाचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला. या तीनही जागेच्या बदल्यात मनपाला शासनाकडे ३० कोटी रुपये जमा करावेच लागतील, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेत या प्रकल्पाला ‘ब्रेक’ लावला असला तरी यामागे भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे रखडलेला प्रस्ताव कसा मार्गी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरात विविध ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या जागा असून, त्यावर उभारण्यात आलेल्या व्यावसायिक संकुलांपासून प्रशासनाला महसूल प्राप्त होतो. मनपाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थितीत सुधार व्हावा, यासाठी माजी महापौर विजय अग्रवाल यांनी शहरातील निवडक आरक्षित जागांवर कमर्शिअल कॉम्पलेक्स उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. शहरातील जनता भाजी बाजारच्या जागेवर कमर्शिअल कॉम्पलेक्स व भाजी बाजाराचे आरक्षण आहे. जुने बसस्थानकाच्या जागेवर सिटी बसस्थानक व व्यावसायिक संकुलाचे आरक्षण आहे. गांधी जवाहर बागेलगतच्या मैदानावर आॅडिटेरिअम हॉलचे आरक्षण आहे. या तीन जागेचा विकास करण्यासाठी विजय अग्रवाल यांनी तत्कालीन राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केले असता, शासनाने मंजुरी दिली होती.
अधिकारांचा वापर; विकासाला खोडा
भाजपातील गटबाजी जगजाहीर असली तरी त्याचा परिणाम विकास कामांवर होत असल्याचे चित्र आहे. या तीन जागांवर उभारल्या जाणाºया वास्तूंमुळे शहराच्या विकासात भर पडणार आहे. पक्षांतर्गत गटबाजी व अधिकाराच्या गैरवापरातून जिल्हा प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर झाल्यामुळेच सदर प्रकल्पाला पद्धतशीरपणे ‘ब्रेक’ लावण्यात आल्याची माहिती आहे.
जुने बसस्थानक
- आरक्षण क्रमांक १०३, वाणिज्य संकुल व सिटी बसस्थानक
- एकूण क्षेत्रफळ- १ लक्ष ४ हजार ७५ चौरस फूट
- जमा होणारी रक्कम- ७ कोटी ३९ लक्ष ९३ हजार
जनता भाजी बाजार
- आरक्षण क्रमांक २०३, वाणिज्य संकुल व भाजी बाजार
- एकूण क्षेत्रफळ- २.४७ हेक्टर आर
- जमा होणारी रक्कम- १८ कोटी ८० लक्ष ३५ हजार
आॅडिटेरिअम
- आरक्षण क्रमांक १९८, आॅडिटेरिअमची उभारणी
- जमा होणारी रक्कम- ३ कोटी ७ लक्ष २ हजार