अकोला-खंडवा ब्रॉडगेज : मेळघाटातून व्हावी ‘एलिवेटेड ट्रॅक’ची चाचपणी!
By Atul.jaiswal | Published: August 12, 2020 10:44 AM2020-08-12T10:44:29+5:302020-08-12T10:47:18+5:30
मेळघाटातील मीटरगेज मार्गावरूनच ‘एलिव्हेटेड ट्रॅक’ उभारून या मार्गाचे काम पूर्णत्वास नेता येईल का, याची चाचपणी करण्याची मागणी आता या मार्गाच्या समर्थकांकडून होत आहे.
- अतुल जयस्वाल
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला ते खांडवा या मीटरगेज रेल्वे मार्गाचे अकोला ते अकोटपर्यंत ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन झाल्यानंतर मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या अकोट ते अमलाखुर्द दरम्यानच्या पट्ट्याचे काम पर्यावरण प्रेमींच्या विरोधामुळे रखडलेले असतानाच, आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्यासाठी मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाऐवजी बाहेरून जाणाºया मार्गाचा पर्याय निवडावा, अशी भूमिका घेतल्यामुळे हा प्रकल्पच वांद्यात पडला आहे. एकीकडे राज्य सरकार व पर्यावरण प्रेमींचा विरोध, तर दुसरीकडे पर्यायी मार्गासाठीची भूसंपादन व इतर प्रक्रिया वेळखाऊ व किचकट असल्याने रेल्वेकडून हा प्रकल्पच थंड बस्त्यात टाकला जाऊ नये, यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मेळघाटातील मीटरगेज मार्गावरूनच ‘एलिव्हेटेड ट्रॅक’ उभारून या मार्गाचे काम पूर्णत्वास नेता येईल का, याची चाचपणी करण्याची मागणी आता या मार्गाच्या समर्थकांकडून होत आहे.
अकोला ते खंडवा या एकूण १७६ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा ३८ किलोमीटरचा पट्टा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी २३ किलोमीटरचा मार्ग हा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्याने पर्यावरणप्रेमींचा या मार्गाला विरोध होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मेळघाटातील वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊ नये म्हणून, मेळघाटाबाहेरच्या मार्गाचा विचार व्हावा, अशी भूमिका घेतली आहे.
बुलडाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांनीही पर्यायी मार्ग बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद-संग्रामपूर तालुक्यातील नेण्याचा आग्रह धरला आहे.
पर्यायी मार्गामुळे हे अंतर २९ किलोमीटरने वाढणार असून, भूसंपादन व इतर पयाभूत कामांवर अतिरिक्त ७५० कोटी रुपये खर्च होणार आहे. शिवाय शेकडो हेक्टरवर वृक्षतोडही करावी लागणार आहे. व्यावहारिकदृष्ट्या हे परवडणारे नसल्यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा प्रकल्पात सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गावरच एलिवेटेड ट्रॅक उभारण्याची मागणी अकोला, वाशिम, हिंगोली जिल्ह्यातील रेल्वेप्रवाशांकडून होत आहे.
गाभा क्षेत्रातून जाणाºया रेल्वेमार्गाला तारांचे कुंपन केल्यास वाघ किंवा इतर वन्यप्राण्यांना रेल्वेमार्गावर येण्यापासून रोखले जाऊ शकते.
अकोला-खंडवा बाबत दूजाभाव का?
राज्य वन्यजीव मंडळाच्या ७ आॅगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर ते नागभीड नॅरोगेज लाइनच्या गेज परिवर्तनासाठी जंगलातून जाणाºया मार्गासाठी एलिव्हेटेड ट्रॅक उभारणे शक्य आहे का, याची चाचपणी करण्याची गरज प्रतिपादित केली होती. हाच धागा धरत अकोला-खंडवा लाइनच्या मेळघाटातून जाणाºया मार्गासाठी ऐलिवेटेड ट्रॅकचा पर्याय निवडावा, अशी मागणी होत आहे. एकीकडे नागपूर-नागभीडसाठी एलिव्हेटेड ट्रॅकचा विचार, तर दुसरीकडे मेळघाटातील मार्गाला विरोध, असा दुजाभाव का, असा सवालही या मार्गाचे समर्थक उपस्थित करत आहेत.