भूमी अभिलेख विभागाचा अजब कारभार; उमरी रस्त्याचे रेकॉर्डच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:41 PM2018-04-28T14:41:21+5:302018-04-28T14:41:21+5:30
भूमी अभिलेख विभागाने मोजणी शिट तयार केली असली, तरी या विभागात उमरी रस्त्याचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोजणी शिटवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
- आशिष गावंडे
अकोला :महापालिका क्षेत्रात सामील झालेल्या मोठी उमरी ते गुडधीपर्यंत प्रशस्त रस्ता तयार करण्यासाठी आ. रणधीर सावरकर यांनी निधीची तरतूद केली. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असल्यामुळे ‘पीडब्ल्यूडी’ने शासकीय मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे शुल्क जमा केले. भूमी अभिलेख विभागाने मोजणी शिट तयार केली असली, तरी या विभागात उमरी रस्त्याचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोजणी शिटवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे ‘पीडब्ल्यूडी’ व मनपाच्या यंत्रणेने मोजणी शिट गृहित धरून रस्त्याचा मध्यभाग (सेंटर) व रस्त्यालगच्या मालमत्तांना ‘मार्किंग’ करणे सुरू केल्यामुळे गोंधळात भर पडली आहे. हा प्रकार पाहता उमरी ते चाळीस क्वॉर्टरपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाला खिळ बसण्याची चिन्ह दिसून येत आहेत.
प्रशासकीय यंत्रणांची हलगर्जी व उदासीनतेमुळे विकास कामांना लालफितशाहीत गुंडाळल्या जात असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. असाच काहिसा प्रकार मोठी उमरी ते गुडधीपर्यंत होणाºया रस्ता रुंदीकरणाच्या बाबतीत समोर आला आहे. शहरालगतच्या २४ गावांचा हद्दवाढीमुळे महापालिका क्षेत्रात समावेश झाला. निश्चितच यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याने हद्दवाढीतील नवीन प्रभागांच्या विकास कामांसाठी आ. रणधीर सावरकर आग्रही असून, त्यांनी नुकतीच १०० कोटींच्या विकास आराखड्याला शासनाची मंजुरी मिळवली. यादरम्यान, मोठी उमरी ते गुडधी परिसरातील चाळीस क्वॉर्टरपर्यंत १ हजार ८०० मीटर मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमी अभिलेख विभागाकडे शासकीय मोजणीकरिता शुल्क जमा केले. भूमी अभिलेख विभागाने मोठी उमरीतील रेल्वे पूल ते चाळीस क्वॉर्टरपर्यंत रस्ता व रस्त्यालगतच्या मालमत्तांची मोजणी शिट तयार केली. मोजणी शिटची प्रत माहितीस्तव मनपाकडे सादर करण्यात आली. ही प्रत प्राप्त होताच ‘ पीडब्ल्यूडी’ व मनपाचा नगररचना विभाग, विद्युत विभाग कामाला लागला. रस्त्याचा मध्यभाग (सेंटर) काढून रस्त्यालगतच्या इमारतींना ‘मार्किंग’ करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, रेल्वे पुलापासून ते महादेव मंदिर ते अंबिका ज्वेलर्सपर्यंत ‘मार्किंग’चे काम पूर्ण झाले आहे.