शासनाच्या भूखंडावर बँकेतून कर्ज घेण्याचा होता डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 02:26 AM2017-08-07T02:26:17+5:302017-08-07T02:26:17+5:30
२० कोटींच्या भूखंडावर १५ कोटी कर्जासाठी हालचाल
सचिन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २० कोटी रुपयांचा भूखंड बनावट कागदपत्रांद्वारे हडपल्यानंतर सदर भूखंड २६ कोटी रुपयांमध्ये खरेदी-विक्रीचा जम बसला नाही, तर या भूखंडावर तब्बल १५ ते १७ कोटी रुपयांचे कर्ज बँकेतून घेण्याचा डाव आखण्यात आला होता, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. सदर प्रकरणाची तक्रार अमर डिकाव यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केल्यानंतर भूखंड हडपण्याचा आणि खरेदी-विक्रीसह त्याच्यावर कर्ज घेण्याचा बेत फसला आहे.
अकोला शहरातील शीट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शीट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिराच्या पाठीमागील भागात मोठे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडा तील शीट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून २० कोटी रुपये किमतीचा ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर म्हणजेच तब्बल ४० हजार स्क्वेअर फूट भूखंडाची कोणतेही हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संगनमताने गजराज गुडदमल मारवाडी यांच्या नावाने हा भूखंड असल्याची संगणकीकृत खोटी नोंद घेण्यात आली आहे. त्यानंतर अशाच प्रकारच्या बनावट दस्तावेजाद्वारे खोटे मालमत्ता पत्रकही तयार करण्यात आले आहे. या जागेचे फ ेरफार व अन्य दस्तावेजही बनावट तयार करण्यात आले आहेत. आॅनलाइन प्रक्रियेमध्ये भूखंड कागदोपत्री नावावर होताच हा भूखंड विक्री व्यवहाराच्या हालचाली सुरू होत्या; परंतु हा व्यवहार फसण्याची शक्यता असल्याने गजराज मारवाडी याच्या नावाने बँकेतून तब्बल १५ ते १७ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा बेत आखण्यात आला होता; मात्र डिकाव यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करताच या भूखंड हडपणाºयांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्या गेले आहे. पोलिसांनी भूमी अभिलेखाच्या त्या तीन कर्मचाºयांना ताब्यात घेतल्यास सर्वच आरोपींचा पर्दाफाश होणार असल्याचे तक्रारकर्ते अमर डिकाव यांचे म्हणणे आहे.