राठी पेढेवालाच्या रसमलाईत आढळल्या अळ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 10:32 AM2021-01-11T10:32:21+5:302021-01-11T10:36:16+5:30
Akola News राठी पेढेवाला दुकानातील रसमलाईचे नमुने संकलित केले असून, ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
अकोला : राठी पेढेवाला हॉटेलमधून घेतलेल्या रसमलाईत अळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित ग्राहकाने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाद्वारे राठी पेढेवाला दुकानातील रसमलाईचे नमुने संकलित केले असून, ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्त्याचा मुलगा शहरातील एका रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार घेतल्यानंतर त्याला सामान्य वॉर्डात दाखल करण्यात आले होते. मुलाला रसमलाई खाण्याची इच्छा झाल्याने तक्रारकर्त्याने मुलासाठी राठी पेडेवाल्याच्या दुकानातून रसमलाई खरेदी केली. मुलाला देण्यासाठी रसमलाईचा डब्बा उघडताच त्यात अळ्या आढळल्याने तक्रारकर्त्यांला धक्का बसला. या प्रकरणी तक्रारकर्त्याने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, या प्रकरणात पोलिसांना गुन्हा दाखल करता येत नसल्याने हे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाकडे वळते करण्यात येणार असल्याचे सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याचे ठाणेदार मडावी यांनी दिली. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाला या प्रकरणाची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी राठी पेढेवाले येथील रसमलाईचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
पोलिसांमार्फत अद्यापही तक्रार मिळाली नाही, परंतु प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध विभागामार्फत राठी पेढेवाले यांच्या दुकानातील रसमलाईचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
- रावसाहेब वाकडे, अन्न निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन