अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: सहाही विधानसभा क्षेत्रात धोत्रेंना आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:00 PM2019-05-24T13:00:13+5:302019-05-24T13:01:47+5:30
अकोला: लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार संजय धोत्रे यांना मतदारसंघात समाविष्ट सहाही विधानसभा क्षेत्रात चांगलेच मताधिक्य मिळाले आहे.
अकोला: लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार संजय धोत्रे यांना मतदारसंघात समाविष्ट सहाही विधानसभा क्षेत्रात चांगलेच मताधिक्य मिळाले आहे. विशेष म्हणजे, अकोला पूर्व मतदारसंघात ते विक्रमी आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नाने त्यामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. या मतदारसंघात अकोला शहराचा भागही असल्याने त्याचा चांगलाच फायदा झाला आहे.
मतमोजणीतून संजय धोत्रे यांना गतवेळीपेक्षाही अधिक मताधिक्याने विजय मिळाला आहे. त्यासाठी भाजपने बुथ पातळीवर केलेली पक्षाची बांधणी चांगलीच कामी आली. विधानसभेचे सहापैकी चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत, तर बाळापूर भारिप-बमसं, रिसोड काँग्रेसच्या ताब्यात आहे. या मतदारसंघातही भाजपला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळेच धोत्रे यांच्या एकूण मताधिक्यात कमालीची वाढ झाली. विशेष म्हणजे, रिसोड मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला हवी तेवढी मते मिळालेली नाहीत. त्याशिवाय, काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांचा तालुका असलेल्या अकोट मतदारसंघातही त्यांना फारसे मतदान झालेले नाही. परिणामी, २०१४ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले पटेल या निवडणुकीत तिसºया क्रमांकावर फेकले गेले आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांना काही मतदारसंघांत मताधिक्य मिळाल्याने त्यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली आहेत.
लोकसभा २०१४ च्या निवडणुकीत धोत्रे यांना ४ लाख ५५ हजार ९९६ मते मिळाली होती. त्यामध्ये यावेळी एक लाखापेक्षाही अधिक वाढ झाली आहे, तर आंबेडकर यांना ४० हजारांपेक्षाही मते वाढली आहेत. हिदायत पटेल यांनी गत निवडणुकीतील मतसंख्या कायम राखली आहे. पाच विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा प्रतिनिधी नसतानाही उमेदवाराला बºयापैकी मते मिळाल्याने परंपरागत मतदार कायम असल्याचे चित्रही यानिमित्ताने पुढे आले आहे.
- उर्वरित विधानसभा क्षेत्रावर प्रभाव
विशेष म्हणजे, भाजपच्या ताब्यात अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर व अकोट मतदारसंघ आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर आणि रिसोड मतदारसंघातही भाजपचा उमेदवार विजयी होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र त्यावेळी रिंगणातील उमेदवार, परिस्थिती, मुद्यांच्या विषयावर चित्रात फरक पडू शकतो.
‘की फॅक्टर’ काय ठरला...
१ - गत लोकसभेनंतर विधानसभेतही चांगलेच यश मिळाल्याने ते कायम ठेवण्यात भाजप यशस्वी ठरले.
२ - केंद्र व राज्य शासनाच्या विकास योजनांची प्रचार, प्रसिद्धीचाही बराच लाभ मिळाला.
३ - खासदारकीच्या कार्यकाळात कोणत्याही वादात न पडल्याने त्याचा फायदा धोत्रेंना झाला.