...म्हणून वाढले संजय धोत्रेंचे मताधिक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:20 PM2019-05-24T13:20:07+5:302019-05-24T13:20:14+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यात चांगलीच उलथापालथ झाली.
अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी अकोला मतदारसंघात उमेदवारी दाखल केल्यानंतर निर्माण झालेल्या चित्रामुळे एकतर्फी विजयाचे संकेत असताना विविध पक्षांच्या नेत्यांनी घेतलेल्या सभांमुळे प्रचारात चांगलीच रंगत आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यात चांगलीच उलथापालथ झाली. त्याचा फटका काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला बसला. विजयी उमेदवार संजय धोत्रे यांचे मताधिक्य कमालीचे वाढले.
लोकसभा मतदारसंघातील रिसोड विधानसभा क्षेत्रात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सभा घेत काँग्रेसच्या घराणेशाहीवर हल्ला चढविला होता. त्याच दिवशी अकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनीही प्रचारसभा घेतली. तेथे त्यांनी काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्यासाठी मते मागितली. त्यावेळी देश मोदी किंवा संविधानानुसार चालत नसून, ‘आरएसएस’कडून चालविला जात असल्याचे सभेत सांगितले होते.
भाजपने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांच्या सभा लावल्या. लोकसभा मतदारसंघातील तीन कोपऱ्यांत या सभा झाल्या, तर त्याचवेळी काँग्रेस प्रचारातही कमी पडली. केवळ दोन सभा त्याही लगतच्या मतदारसंघात झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मतदारसंघात भेट देऊन प्रचार केल्याचे उदाहरण पुढे आले नाही.
- मुख्यमंत्र्यांचा जिल्हा परिषदेवर हल्ला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अकोल्यातील मैदानात सभा घेत काँग्रेसच्या उमेदवाराचा नामोल्लेख टाळला. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या सत्तेने ग्रामीण विकासाचे वाटोळे केल्याचे सांगितले होते. त्यानंतर तेल्हारा येथील सभेतही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणावर टीका केली. सोबतच भाजपने देशातील शेतकऱ्यांना पेन्शन लागू करून मोठे काम केल्याचेही सांगितले.
- चव्हाणांचा धोक्याचा इशारा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मूर्तिजापूर मतदारसंघात सभा घेतली. तेथे त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील लोकशाही धोक्यात आणली आहे. त्यांच्या सत्तेमुळे भारतीय संविधानाला धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र या धोक्याला मतदारांनी गाभिर्याने घेतले नसल्याचेच समोर आले आहे. एकूणच या सर्व सभांमुळे जिल्ह्यातील प्रचारात चांगलीच रंगत आणली होती.